Layoffs 2026: IT क्षेत्रात बेरोजगारीचं नवं संकट; १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार, कोणत्या कंपनीने घेतला निर्णय?

SAP Layoffs 2026: जर्मनीतील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी SAP तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा विचार करत आहे.
SAP Layoffs 2026
SAP Layoffs 2026Pudhari
Published on: 
Updated on: 

SAP Layoffs 2026: जगभरातील कंपन्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर वाढत आहे. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवरही दिसू लागला आहे. जर्मनीतील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी SAP तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या या निर्णयाचा फटका इंजिनिअरिंग, सेल्स आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट विभागातील कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

ब्लूमबर्गच्या गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, SAP आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी किमान ९ टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा विचार करत आहे. यासाठी कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणत्या पदांची आवश्यकता नाही, याचा आढावा घेण्यास सांगितले आहे.

इंजिनिअरिंग, सेल्स आणि प्रॉडक्ट विभागांवर लक्ष

कंपनीच्या पुनर्रचनेत प्रामुख्याने प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, इंजिनिअरिंग आणि सेल्स या विभागांचा आढावा घेतला जात आहे. या विभागांमधील कोणती कामे कमी करता येतील आणि कोणत्या पदांची गरज उरणार नाही, याचा विचार सुरू आहे.

मात्र, किती कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार, याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. कर्मचारी प्रतिनिधी आणि कामगार संघटनांशी होणाऱ्या चर्चेनंतर नोकरकपातीचा आकडा बदलू शकतो.

दरम्यान, या वृत्तावर SAP ने थेट शिक्कामोर्तब केलेले नाही. कंपनीने ब्लूमबर्गला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्राहकांच्या गरजांनुसार कंपनी आपल्या संघटनात्मक रचनेचा नियमित आढावा घेत असते. मात्र, नोकरकपातीच्या शक्यतेबाबत अधिक माहिती देण्यास कंपनीने नकार दिला.

AI मुळे कामाचा वेग वाढला, कंपनीचा दावा

SAP चे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिश्चन क्लेन कंपनीच्या व्यवसायात AI चा वापर वाढवण्यावर भर देत आहेत. कंपनी केवळ ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमध्येच AI चा समावेश करत नाही, तर स्वतःच्या कार्यालयीन कामकाजातही या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. AI मुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे, नियमित कामे कमी वेळेत पूर्ण करणे आणि कामाचा वेग वाढवणे, हा कंपनीचा उद्देश आहे.

SAP Layoffs 2026
India Entrepreneurship: भारत जगात अव्वल! ८५ टक्के भारतीयांना व्हायचंय उद्योजक; Gen Z मध्ये सर्वाधिक क्रेझ, AIमुळे बदललं चित्र

ऑक्टोबरमध्ये झालेल्या गुंतवणूकदारांसोबतच्या चर्चेत SAP ने AI मुळे मिळालेल्या फायद्यांची माहिती दिली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, उत्पादकता २० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. तसेच AI च्या मदतीने सेल्स प्लॅनिंगचे काम ५० टक्क्यांपर्यंत वेगाने पूर्ण होऊ लागले आहे.

त्यामुळे ज्या विभागांमधील कामे AI च्या मदतीने कमी वेळेत करता येऊ शकतात, तिथे कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा विचार केला जात आहे. मात्र, प्रस्तावित नोकरकपात थेट AI मुळेच केली जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केलेले नाही.

कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनातही बदल

SAP मध्ये नोकरकपातीच्या चर्चेदरम्यान वरिष्ठ व्यवस्थापनातही मोठे बदल होणार आहेत. कंपनीच्या सहा सदस्यांच्या कार्यकारी मंडळातील दोन सदस्य मार्च महिन्यात पद सोडण्याची शक्यता आहे.

यामध्ये कंपनीचे प्रॉडक्ट प्रमुख मुहम्मद आलम यांचा समावेश आहे. तर सेल्स प्रमुख थॉमस सॉअरसेसिग यांनीही पद सोडण्याची तयारी केली आहे. ते जर्मनीतील क्लाउड कम्प्युटिंग कंपनी Ionos ची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

SAP Layoffs 2026
Elon Musk SpaceX Shares: अमेरिकेतील प्रत्येक मुलगा होणार करोडपती? एलन मस्क देणार SpaceXचे 2 शेअर्स; कोणाला होणार फायदा? काय आहे प्लॅन?

खर्च कमी करण्यावर कंपनीचा भर?

गेल्या काही वर्षांत SAP ने आपल्या व्यवसायाचा विस्तार करत कर्मचारी संख्येत वाढ केली होती. मात्र, आता कंपनीचा भर कर्मचारी संख्या वाढवण्याऐवजी उपलब्ध मनुष्यबळाकडून अधिक काम करून घेणे आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे यावर असल्याचे दिसत आहे.

AI चा वाढता वापर, कामातील सुधारलेली कार्यक्षमता आणि वरिष्ठ व्यवस्थापनातील बदल या पार्श्वभूमीवर SAP मोठ्या पुनर्रचनेच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

मात्र, १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरकपातीचा प्रस्ताव अद्याप विचाराधीन आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आणि कोणत्या विभागांवर सर्वाधिक परिणाम होणार, हे कंपनीच्या अंतिम निर्णयानंतरच स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.