Tech Layoffs 2026: दररोज ४५९ जणांच्या नोकऱ्या जात आहेत; AI मुळे कंपन्यांमध्ये नोकरकपातीचा धडाका, भारतासाठी धोक्याची घंटा

Tech Layoffs 2026: मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, अॅमेझॉन आणि मेटासह अनेक कंपन्यांमध्ये नोकरकपात झाली असून AI चा वाढता वापर हे त्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे.
Tech Layoffs 2026
Tech Layoffs 2026Pudhari
Published on: 
Updated on: 

Tech Layoffs 2026: जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरकपातीचे संकट अधिक गडद होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर, खर्च कमी करण्याचे प्रयत्न आणि कामातील बदल यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. Layoffs.fyi या संकेतस्थळाच्या आकडेवारीनुसार, २१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत जगभरातील ३२८ कंपन्यांनी एकूण १ लाख ३४ हजार ९१७ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

म्हणजेच, दररोज सरासरी ४५९ कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे, २०२५ मध्ये संपूर्ण वर्षभरात १ लाख २२ हजार ६०६ कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. यंदा ऑक्टोबरमध्येच हा आकडा त्यापुढे गेला आहे.

मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल आणि अॅमेझॉनमध्ये मोठे बदल

मायक्रोसॉफ्टने सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना जाहीर केली आहे. मात्र, हे सर्व कर्मचारी कंपनी सोडतीलच असे नाही. यापूर्वी अशा योजनांमध्ये साधारण ३ ते ५ टक्के कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले आहे.

ओरॅकलने २०२६ या आर्थिक वर्षात आपल्या कर्मचारी संख्येत सुमारे २१ हजारांची कपात केली. अॅमेझॉनने जानेवारीमध्ये १६ हजार नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली. मेटानेही सुमारे ८ हजार कर्मचाऱ्यांना कमी केले. कंपनीचा वाढता AI खर्च हे त्यामागील एक कारण असल्याचे सांगितले जात आहे.

Tech Layoffs 2026
Jio Platforms Share Listing: जिओ प्लॅटफॉर्म्सचा पहिल्याच दिवशी शेअर बाजारात धमाका; गुंतवणूकदारांना एका लॉटवर किती रुपये मिळाले?

बँकिंग क्षेत्रातही नोकरकपात

नोकरकपातीचा फटका केवळ तंत्रज्ञान कंपन्यांनाच बसत नाही. बार्कलेज बँक वर्षाच्या शेवटी सुमारे ५ हजार नोकऱ्या कमी करणार आहे. यातील काही पदे AI आणि कामकाजातील बदलांशी संबंधित आहेत. अमेरिकन एक्स्प्रेसनेही आपल्या कर्मचारी संख्येत सुमारे ५ टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जवळपास ३ हजार ५०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो.

भारतीय कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार?

भारतातील कर्मचाऱ्यांसाठीही ही चिंतेची बाब आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँक २०३० पर्यंत आपल्या बॅक ऑफिसमधील १५ टक्क्यांहून अधिक पदे कमी करण्याच्या तयारीत आहे. एचएसबीसीमध्येही मोठ्या प्रमाणावर नोकरकपातीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतीय IT कंपन्यांमध्येही कर्मचारी कपात सुरू आहे. मात्र, नव्या कर्मचाऱ्यांची भरती पूर्णपणे थांबलेली नाही. TCS, इन्फोसिस आणि कॉग्निझंट यांसारख्या कंपन्या नव्या पदवीधरांना संधी देण्याचा प्लॅन करत आहेत. AI क्षेत्रात चांगली कौशल्ये असलेल्या अभियंत्यांनाही बाजारात मोठी मागणी आहे.

Tech Layoffs 2026
Silver Price Crash: चांदीच्या दरात ५० टक्के घसरण; जानेवारीच्या तुलनेत भाव निम्म्यावर, आता खरेदी करावी की आणखी वाट पाहावी?

AI मुळेच नोकऱ्या जात आहेत का?

तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक नोकरकपातीमागे AI हे एकमेव कारण नाही. वाढता खर्च, कंपनीची पुनर्रचना आणि कामकाजातील बदल यांचाही त्यात वाटा आहे. काही कंपन्या AI साठी मोठी गुंतवणूक करत आहेत, तर काही कंपन्या AI च्या मदतीने कमी कर्मचाऱ्यांत अधिक काम करण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यामुळे भविष्यात नोकऱ्यांचे स्वरूप बदलण्याची शक्यता आहे. विशेषतः तंत्रज्ञान आणि AI कौशल्ये आत्मसात करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक संधी मिळू शकतात. मात्र, AI मुळे नेमक्या किती नोकऱ्या कायमच्या कमी होतील, याबाबत अद्याप स्पष्ट चित्र समोर आलेलं नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news