Stock Markets Updates
गेली सहा आठवडे नुकसानीचे गेल्यानंतर अखेर भारतीय शेअर बाजाराने सोमवारी (दि. ११ ऑगस्ट) जोरदार रिकव्हरीचे संकेत दिले. सेन्सेक्स आज ७४६ अंकांनी वाढून ८०,६०४ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक २२१ अंकांच्या वाढीसह २४,५८५ वर स्थिरावला. कच्च्चा तेलाच्या दरातील घसरण, जागतिक सकारात्मक संकेत हे सेन्सेक्स आणि निफ्टीच्या वाढीमागे महत्त्वाचे घटक ठरले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लागू केल्याने गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात घसरण दिसून आली होती. आजही शेअर बाजाराची सुस्त सुरुवात झाली होती. पण त्यानंतर बाजाराने तेजीच्या दिशेने उसळी घेतली.
आजच्या दमदार तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ३.३९ लाख कोटींनी वाढून ४४४.०२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. ते याआधी ८ ऑगस्ट रोजी ४४०.६३ लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.३९ लाख कोटींची वाढ झाली.
सर्वाधिक तेजी पीएसयू बँक, रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये दिसून आली. Nifty PSU Bank निर्देशांक २.२ टक्के वाढून बंद झाला. तर निफ्टी रियल्टी १.८ टक्के वाढला.
सेन्सेक्सवर टाटा मोटर्सचा शेअर्स ३.२ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. त्याचबरोबर इटरनल, ट्रेंट, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, एलटी, सन फार्मा, रिलायन्स, कोटक बँक, ॲक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, एम अँड एम, एचडीएफसी बँक हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर दुसरीकडे भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारती एअरटेल हे शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून आली.