

Stock Market Updates
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल दरम्यान युद्धबंदीची (Israel Iran ceasefire) घोषणा केली. यामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किमती कमी झाल्या. या निर्णयाचे भारतीय शेअर बाजाराने जोरदार स्वागत केले. यामुळे मंगळवारी (दि.२४ जून) सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ७५० हून अधिक अंकांनी वाढून ८२,६५० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक सुमारे २०० अंकांच्या वाढीसह २५,२०० जवळ व्यवहार करत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली.
क्षेत्रीयमध्ये निफ्टी बँक, ऑटो, फायनान्सियल सर्व्हिसेस, मेटल पीएयसू बँक, ऑईल अँड गॅस निर्देशांक वाढले आहेत. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅपदेखील सुमारे १ टक्के वाढून खुले झाले आहेत.
सेन्सेक्सवर ३० पैकी २८ शेअर्स हिरव्या रंगात खुले झाले आहेत. अदानी पोर्ट्सचा शेअर्स ३.७ टक्के वाढला आहे. त्याचबरोबर अल्ट्राटेक सिमेंट, एलटी, एम अँड एम, एसबीआय, एशियन पेंट्स, टाटा स्टील, टाटा मोटर्स हे शेअर्स १ ते २ टक्के वाढले आहेत. तर दुसरीकडे एनटीपीसी शेअर्स ३.२ टक्के घसरला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर्सही लाल रंगात खुला झाला आहे.
इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष वाढल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या होत्या. यामुळे सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली होती. पण इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धबंदीच्या घोषणेनंतर कच्च्चा तेलाच्या किमती सुमारे ३ टक्क्यांनी कमी झाल्या. यामुळे बाजारातील भावना उंचावल्या. आशियाई बाजारात तेजीचे वातावरण आहे. याचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजारातील निर्देशांकांनीही तेजीत सुरुवात केली.