

गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांचा कल हा थेट शेअर खरेदी करण्याऐवजी इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीकडे वाढला आहे. हा एक चांगला ट्रेंड आहे. अन्य गुंतवणूक योजनांच्या तुलनेत इक्विटी म्युच्युअल फंडने चांगला परतावा दिला आहे; परंतु कालावधी हा तितकाच महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना आणि गुंतवणूक कायम ठेवताना चुका टाळल्या पाहिजेत.
इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो; मात्र हा परतावा दरवर्षी सारखाच मिळतो, असे नाही. यासाठी मुदत ठेव योजना आहे. परंतु, इक्विटीतील गुंतवणुकीत सतत चढ-उतार होत असतो. तुमच्या गुंतवणुकीचा कार्यकाळ हा सात वर्षांपेक्षा कमी असेल, तर भांडवल कमी राहण्याचा धोका असतो. त्यामुळे इक्विटीसाठी अधिकाधिक कालावधीचा विचार करणे आवश्यक आहे. तुमच्याकडे एवढा वेळ नसेल, तर मुदत ठेवीसारख्या योजनांचा विचार करावा. दीर्घकाळातील गुंतवणुकीने इक्विटीचा प्रवास स्थिर राहतो आणि बाजारातील चढ-उताराचा कालांतराने त्यावर परिणाम होत नाही. इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक दहा पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळासाठी असावी. तसेच दरवर्षी चांगल्या परताव्याची अपेक्षा ठेऊ नये, हे देखील तितकेच खरे.
गुंतवणूक करताना आर्थिक ध्येय असणे आवश्यक आहे. तुमचे लक्ष्य मोटार खरेदी करणे, घर खरेदी करणे, मुलांचे शिक्षण, विवाह, निवृत्ती आदी असू शकतात. यापैकी कोणतेच लक्ष्य नसेल, तर गुंतवणूक ही केवळ धनवृद्धीसाठी राहू शकते. ध्येय गाठण्याचा कालावधी आणि त्यातील बदलाच्या आधारावर गुंतवणुकीची योजना निवडली पाहिजे. परदेशातील प्रवास किंवा घर खरेदीचे ध्येय पुढे ढकलता येऊ शकते. मात्र, मुलांचे शिक्षण अणि विवाह टाळता येऊ शकत नाही. त्यामुळे ध्येयाच्या जवळ आल्यानंतर चढ-उतारापासून वाचण्यासाठी इक्विटीतील रक्कम ही डेट फंडमध्ये स्थानांतरित करणे आवश्यक आहे.
काही गुंतवणूकदार एकसारख्या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करतात आणि त्यामुळे वैविध्यकरणाचा लाभ कमी राहतो. मात्र, आपल्या पोर्टफोलिओत पाचपेक्षा कमी योजना असू नयेत. तसेच एक किंवा दोनच योजनांत गुंतवणूक करण्याचे टाळावे. आपल्या ध्येयाच्या आधारे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, टॅक्स सेव्हिंग, हायब्रीड यांसारख्या योजनांतून गुंतवणूक करावी. तसेच एसआयपीला टॉप अप करणे देखील फायद्याचे राहते. दरवर्षी दहा टक्केदराने गुंतवणुकीची रक्कम वाढवत राहावी.
अनेक जण इक्विटी बाजारातून अवास्तव परताव्याची अपेक्षा करतात. परंतु, दीर्घकाळात म्युच्युअल फंड महागाई दराच्या साडेसहा टक्क्यांपेक्षा अधिक दर देतात आणि हा दर अन्य गुंतवणूक योजनेपेक्षा चांगला राहतो. काही जण चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडच्या नावाखाली फसव्या योजनेत पैसे जमा करायला सांगतात. अशावेळी पैसे बुडण्याची शक्यता अधिक राहते. शेअर बाजारातून गॅरेंटेड परतावा कधीच मिळत नाही. मात्र, ही मंडळी हमखास परताव्याचा दावा करत लोकांची फसवणूक करत असतात.
काही जण इक्विटी योजनाला शेअर बाजाराप्रमाणे समजतात आणि कमी एनएव्ही असणार्या योजनांची निवड करतात; मात्र एनएव्हीचे मूल्य हे योजनेतील स्टॉक्सचे मूल्य सांगतात. त्यामुळे न्यू फंड ऑफर (एनएफओ) दहा रुपयांचा आहे, म्हणून त्याची खरेदी करणे जोखमीचे राहू शकते.
बाजारात घसरत असताना पॅनिक होऊन काही जण एसआयपी थांबवतात किंवा पैसे काढून घेतात. त्यामुळे बाजाराच्या घसरणीच्या लाभापासून गुंतवणूकदार वंचित राहतो. या काळात गुंतवणूक कायम ठेवावी अणि जादा पैसे असतील, तर अधिक गुंतवणुकीचा विचार करावा.
इक्विटी योजनेत गुंतवणूक करताना वेळोवेळी असेट अॅलोकेशन आणि त्यानुसार पुनर्रचना करण्याचे विसरू नये. तुम्ही असेट अॅलोकेशनचे पालन आणि फेररचना करत असाल, तर ही कृती परतावा वाढविण्याचे काम करते. असेट अॅलोकेशन आणि पुनर्रचना केली नाही तर घसरणीमुळे मिळणार्या फायद्यापासून तुम्ही वंचित राहू शकता किंवा नुकसानही होऊ शकते. याप्रमाणे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करत, सहजपणे महागाई दरावर मात करू शकता आणि तुमचे आर्थिक स्वप्न पूर्ण करू शकता.
गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा घेतला पाहिजे. ध्येयानुसार केली जाणारी गुंतवणूक ही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत आहे की नाही, ते पाहणे महत्त्वाचे आहे. बर्याच काळापासून नकारात्मक परतावा असेल किंवा कमी मिळत असेल, तर अशावेळी दुसर्या योजनेत स्थानांतरित व्हा किंवा गुंतवणूक वाढवा. त्याचवेळी गरजेपेक्षा जास्त आढावा घेणेदेखील नुकसानकारक आहे. दर महिन्यांच्या कामगिरीवरून निर्णय घेऊ नका. दरवर्षी एकदा त्याचा आढावा घेणे योग्य आहे.