

Stock Market Updates
मुंबई : परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या जोरावर भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी (दि.२ मे) तेजीत सुरुवात केली. सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ७५० अंकांनी वाढून ८१ हजारांवर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक १५० हून अधिक अंकांच्या वाढीसह २४,५०० वर व्यवहार करत आहे.
आजच्या सत्रातील तेजीत आयटी शेअर्स आघाडीवर आहेत. निफ्टी आयटी १.३ टक्के वाढला आहे. कोफोर्ज ३ टक्के, पर्सिस्टंट, LTIMindtree प्रत्येकी २ टक्के वाढले आहेत.
सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्सचा शेअर्स सुमारे ५ टक्के वाढला. त्याचबरोबर इंडसइंड बँक, मारुती, एम अँड एम, टीसीएस, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय, टाटा मोटर्स, इन्फोसिस, टाटा स्टील, रिलायन्स, एचडीएफसी बँक, एसबीआय हे शेअर्सही तेजीत खुले झाले आहेत. तर टायटन, नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स घसरले आहेत.
अमेरिकेच्या शेअर बाजारातील तेजी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताशी लवकर द्विपक्षीय व्यापार करार करण्याचे दिलेले संकेत, परदेशी गुंतवणूकदारांचे सलग ११ व्या सत्रात खरेदीतील सातत्य आणि आयटी कंपन्यांची चौथ्या तिमाहीतील मजबूत कमाई आदींमुळे शेअर बाजारातील तेजीला बळ मिळाले असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
याआधीच्या बुधवारच्या सत्रात सेन्सेक्स- निफ्टी सपाट पातळीवर बंद झाले होते. भारत- पाकिस्तानदरम्यान वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर सावध भूमिका तसेच अमेरिकेतील व्यापार वाटाघाटीबाबत आशावाद कमी झाल्याचा दबाव बुधवारी भारतीय शेअर बाजारात दिसून आला होता.
पण आज शुक्रवारी शेअर बाजाराने तेजी सुरुवात केली.
चीन अमेरिकेसोबत व्यापार करारावर चर्चा सुरू करण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिकेसह आशियाई बाजारात तेजीचा माहौल आहे. जपानचा निक्केई निर्देशांक १ टक्के वाढला. आशियाई बाजारातील इतर निर्देशांकही वाढले आहेत.