

खराब क्रेडिट स्कोअर दीर्घकाळापर्यंत कमी असेल, तर तुमच्या आर्थिक स्थैर्यावर मोठा परिणाम करू शकतो. भारतात सिबिल ही प्रमुख संस्था आहे, जी क्रेडिट स्कोअर्स राखते. हे स्कोअर कर्ज, क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठीही महत्त्वाचे असतात. सिबिल स्कोअर हे आर्थिक व्यवस्थापन आणि विविध क्रेडिट साधने वापरण्याची पद्धत दर्शवणारे महत्त्वाचे निदर्शक आहे. सामान्यतः, 750 किंवा त्यापेक्षा जास्त स्कोअर ‘उत्तम’ मानला जातो. तुम्ही कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी स्कोअर सुधारण्याचा विचार करत असाल, तर काही सोप्या पायर्या आहेत, ज्या तुम्ही पाळू शकता. मात्र, त्यासाठी काही आर्थिक खराब सवयी टाळणे आवश्यक आहे.
1. हप्ते किंवा पेमेंटस् चुकवणे टाळा : कर्जाचे किंवा क्रेडिट कार्डचे पेमेंट वेळेवर न करणे ही तुमच्या क्रेडिट स्कोअरला खालावण्याचे एक मोठे कारण आहे. CIBIL आणि इतर क्रेडिट ब्युरो तुमचा पेमेंट इतिहास लक्षात घेऊन स्कोअर ठरवतात. नियमितपणे हप्ते चुकवल्यास कर्जदात्यांना तुम्ही धोकादायक कर्जदार आहात, असे वाटू शकते. जर तुमचा स्कोअर आधीपासूनच कमी असेल, तर वेळेवर पेमेंट करून सकारात्मक ट्रॅक रेकॉर्ड राखणे अत्यंत गरजेचे आहे.
2. जास्त क्रेडिट वापर टाळा : क्रेडिट युटिलायझेशन म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्डवरील खर्च आणि उपलब्ध क्रेडिट मर्यादा याचे प्रमाण. जास्त क्रेडिट वापरल्यास आणि ते अनेक कार्डस्वर असेल, तर तुमच्या स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. सर्वसाधारणपणे, तुमचा क्रेडिट वापर तुमच्या एकूण मर्यादेपैकी 30% पेक्षा अधिक नसावा. जर स्कोअर आधीपासूनच कमी असेल, तर कार्डस्चा अनावश्यक वापर टाळा आणि शक्य तितक्या लवकर थकबाकी भागवण्याचा प्रयत्न करा.
3. कमी कालावधीत अनेक कर्ज किंवा कार्डसाठी अर्ज करू नका : जर तुमचा सिबिल स्कोअर आधीच कमी असेल आणि तुम्ही एका छोट्या कालावधीत अनेक कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करत असाल, तर त्याचा तुमच्या स्कोअरवर वाईट परिणाम होतो. प्रत्येक अर्जामुळे ‘हार्ड इन्क्वायरी’ होते, ज्यामुळे स्कोअर आणखी खाली जातो. कर्जदाते अशा वागणुकीकडे आर्थिक अस्थैर्य म्हणून पाहतात. त्यामुळे नवीन अर्ज करण्याऐवजी चांगले पेमेंट सवयी निर्माण करून स्कोअर सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा.
4. निष्क्रिय क्रेडिट खाती उघडी ठेवू नका : कधी कधी, जुनी पण वापरात नसलेली क्रेडिट खाती उघडी ठेवणं योग्य वाटतं. कारण त्यामुळे एकूण क्रेडिट मर्यादा वाढते. पण, जर ती खाती थकबाकी नसतानाही उघडी ठेवली असतील, तर त्यांचा स्कोअरवर फारसा फायदा होत नाही. विशेषतः, जर त्या खात्यांचा पेमेंट इतिहास खराब असेल, तर ती खाती उघडी ठेवण्याने तुमचा स्कोअर अजून घसरू शकतो म्हणून तुमचा क्रेडिट अहवाल वेळोवेळी तपासा आणि ज्या खात्यांचा फायदा नाही, त्याबाबत बंद करण्याचा विचार करा.
5. क्रेडिट रिपोर्टकडे दुर्लक्ष करू नका : अनेकवेळा लोक आपला CIBIL स्कोअर कमी असल्यास क्रेडिट रिपोर्टकडे दुर्लक्ष करतात. हे टाळा. अनेकदा काही चुकीची नोंद, जुनी माहिती किंवा फसवणुकीची नोंद स्कोअर कमी होण्यामागे असू शकते. तुमचा क्रेडिट रिपोर्ट नियमितपणे तपासल्यास अशा चुका लक्षात येतात आणि CIBIL ला त्वरित कळवून दुरुस्ती करता येते. यामुळे स्कोअर सुधारण्यात मदत होऊ शकते.
निष्कर्ष : क्रेडिट स्कोअर सुधारण्याचं काम कठीण नाही. थोडे आर्थिक शिस्तबद्ध व्यवहार आणि काही साधे उपाय अंमलात आणल्यास, चांगला क्रेडिट स्कोअर राखणे शक्य आहे. पैशांचे आणि क्रेडिट साधनांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास, दीर्घकाळ टिकणारा चांगला स्कोअर सहज मिळवता येतो.