

Post Office Schemes
आता पोस्टाच्या विविध बचत योजनांमध्ये कागदपत्रांशिवाय, पूर्णपणे डिजिटल पद्धतीने गुंतवणूक करता येणार आहे. यासाठी आधार ई-केवायसीची सुविधा सुरू करण्यात आली असून, यामध्ये पीपीएफ (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी) आणि सुकन्या समृद्धी योजना यांचा समावेश आहे.
ऑनलाइन स्वरूपात डिपॉझिट व्हाउचर व फॉर्म उपलब्ध होत असून, ग्राहकांना या योजना डिजिटल किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे सुरू करण्याचा पर्याय खुला आहे. महत्त्वाचे म्हणजे, फॉर्मवर कोणताही आधार क्रमांक दिसू नये यासाठी सर्व पोस्ट ऑफिस व सीबीएस केंद्रांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. एखादा आधार क्रमांक फॉर्मवर दिसत असल्यास, त्यातील पहिले ८ अंक मॅन्युअली काळे करण्याचे निर्देश पोस्टमास्तरला देण्यात आले आहेत.
पोस्टाने यापूर्वीच आधार बायोमेट्रिकद्वारे पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक खाते उघडण्याची सुविधा सुरू केली होती. आता ही सुविधा मासिक बचत योजना, इनकम स्कीम (MIS), टाइम डिपॉझिट (TD), किसान विकास पत्र (KVP) व नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (NSC) या योजनांपर्यंतही विस्तारित करण्यात आली आहे.
खाते उघडण्यासाठी पोस्टातील सहाय्यक कर्मचाऱ्यांकडून प्रक्रिया सुरू केली जाते. ई-केवायसीसाठी आधार क्रमांकाच्या सहाय्याने बोटांचे ठसे घेतले जातात. त्यानंतर खातेदाराचे नाव, योजना प्रकार आणि गुंतवणुकीची रक्कम ही माहिती प्रणालीत भरली जाते. अंतिम प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांदा बायोमेट्रिक पुष्टी केली जाते. या प्रक्रियेमुळे ग्राहकांना वेगळा पे-इन व्हाउचर भरावा लागत नाही.
आधारची एक विशेष सुविधा म्हणजे बायोमेट्रिक लॉक/अनलॉक. यामुळे तुमची बायोमेट्रिक माहिती सुरक्षित राहते आणि गरजेनुसार ती तात्पुरती लॉक किंवा अनलॉक करता येते. या नवीन डिजिटल पद्धतीमुळे पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित झाले आहे.