

Stock Market Updates
मुंबई : परदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या जोरावर भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी (दि. २९) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० हून अंकांनी वाढून ८०,४०० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक ६१ अंकांच्या वाढीसह २४,३९० वर गेला होता. पण त्यानंतर दोन्ही निर्देशांक सपाट पातळीवर आले.
निफ्टी बँक, ऑटो हे निर्देशांक वाढले आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप प्रत्येकी ०.३ टक्के वाढले आहेत.
सेन्सेक्सवर रिलायन्सच्या शेअर्सची घौडदौड कायम आहे. आज हा शेअर्स १ टक्के वाढून व्यवहार करत आहे. इंडसइंड बँक, एलटी, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, ॲक्सिस बँक हे शेअर्सही हिरव्या रंगात खुले झाले. तर दुसरीकडे सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, नेस्ले इंडिया, बजाज फायनान्स, आयटीसी हे शेअर्स घसरले आहेत.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FIIs) भारतीय बाजारातील खरेदीत सातत्य कायम राहिले आहे. त्यांनी सलग ९ सत्रांत देशांतर्गत शेअर बाजारात सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच देशांतर्गत उत्पादित कारच्या परदेशी ऑटो पार्ट्सवरील काही शुल्क कमी कमी करु शकतात, या शक्यतेने ऑटो शेअर्स वधारले आहेत.
भारत आणि पाकिस्तानदरम्यान वाढता भू-राजकीय तणाव असतानाही कार्पोरेट कंपन्यांची मजबूत कमाई, परदेशी गुंतवणुकीचा कायम राहिलेला ओघ, कमकुवत डॉलर आणि कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या घसरणीमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजाराने मोठी तेजी दर्शवली होती. सोमवारच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी १.२ टक्के वाढले होते. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजाराने तेजीत सुरुवात केली.