

गतसप्ताहामध्ये पहिले तीन दिवस गुंतवणूकदारांना एका चांगल्या तेजीबद्दल आश्वासक करणारे होते, विशेषतः सोमवारचा दिवस (21 एप्रिल). या दिवशी बाजारात जी तेजी आली, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण झाला. लार्ज कॅप शेअर्सपेक्षा स्मॉल कॅप शेअर्समध्ये आणि सर्वाधिक मिड कॅप शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी दिसून आली.
FIIS ची पाचही दिवस सलग आणि भरघोस खरेदी, DIIS चीही सप्ताहात विक्रीपेक्षा अधिक खरेदी या दोन्ही गोष्टी आगामी तेजी अधोरेखित करणार्या आहेत.
23 एप्रिल म्हणजे बुधवारी बाजारात आलेली IT Index मधील तेजी लाजवाब होती. आयटी सेक्टर तेजीत असले की बाजारात एक आगळेच चैतन्य येते. कारण Wipro, Infosys, TCS, HCL Tech आणि Tech Mahindra हे Heavy weights निफ्टी 50 इंडेक्समध्ये समाविष्ट असल्यामुळे हे शेअर्स निफ्टी आणि सेन्सेक्सलादेखील वर घेऊन जातात आणि त्याचा परिणाम सर्वच बाजारावर सकारात्मक होतो. ट्रेडर्ससाठी ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. गिफ्ट निफ्टीचा कल काय आहे, हे पाहून सर्व ट्रेडर्स आपली रोजची रणनीती आखतात, गिफ्ट निफ्टीबरोबरच वर सांगितलेले पाच आयटी शेअर्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, बजाज फायनान्स आणि आयटीसी त्यांचाही कल पाहावा. कारण हे शेअर्स हिरव्या रंगात असले की बाजारात तेजी येते. जोडीला मारुती, बजाज ऑटो हे शेअर्सही धावत असतील, तर मग निफ्टीही सुसाट धावू लागतो.
23 एप्रिलची आयटी रॅली HCL Tech. Coforge Persistent Systems, LTI Mindtree, OFSS, Tech Mahindra या शेअर्समुळे घडून आली. Infosys, Mphasis, Wipro, TCS यांनीही रॅलीला हातभार लावला. HCL Tech चे तिमाही आणि वार्षिक निकाल चांगले आले. गुंतवणूकदारांचे आणि तेजीचे इन्फोसिस आणि टीसीएसपेक्षाही एचसीएल टेककडे अधिक लक्ष असते. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लादलेल्या अव्वाच्या सव्वा टॅरीफ वाढीमुळे तडजोड होऊ शकते असे विधान केले आणि अमेरिकन बाजारांमध्ये चैतन्य आले. Amazon, Nvidia, Apple हे शेअर्स चांगलेच वधारले. याचा परिणाम एशियन मार्केटसवर होऊन Nikkei, Kospi, Hangseng या बाजारांमध्ये तेजी आली.
गतसप्ताह निव्वळ आयटी सेक्टरने गाजविला. गुरुवार आणि शुक्रवारच्या पडझडीतही हे सेक्टर झेंडा रोवून उभे राहिले. HCL Tech, Tech Mahindra, Persistent Systems चे उत्तम निकाल या सेक्टरला संजीवनी देणारे ठरले. Mphasis, Tech Mahindra, Coforge या शेअर्समधील तेजी सुखावणारी होती. Newgen Software या शेअरने सप्ताहात Break Out दिला. सॉफ्टवेअर सर्व्हिसेस देणार्या 79 कंपन्या भारतीय बाजारात सूचीबद्ध आहेत. त्यापैकी 4 कंपन्या Mid Cap आणि 75 कंपन्या Small Cap सेगमेंटमध्ये आहेत. त्या 75 कंपन्यांमध्ये सर्वात आघाडीवर असणारी ही कंपनी आज रु. 1055 ला असणारा हा शेअर पाच वर्षांपूर्वी केवळ रु. 55 ला मिळत होता. पाच वर्षांमध्ये 1800 टक्के रिटर्नस! अमिताभ बच्चनच्या भाषेत बोलायचे तर ‘है ऐसा कोई माई का लाल?’
मागील आठवड्यात वाढलेले इतर काही शेअर्स पाहा.
Waaree Energies Rs. 2676.50 वाढ 15.22%
AU Bank Rs. 675.15 वाढ 15.11%
Tata Elxi Rs. 5612.50 वाढ 14.53%
Newgen Software Rs. 1055.65 वाढ 13.99%
Apar Industries Rs. 5539.50 वाढ 12.99%
Atul Rs. 6414.50 वाढ 12.91%
Lloyds Engineering Rs. 71.53 वाढ 16.25%
Choice International Rs. 624.80 वाढ 14.79%
वरील शेअर्सपैकी Waaree Energies या शेअरने मागील सप्ताह खर्या अर्थाने गाजवला. सोलार एनर्जी बनविणार्या कंपन्यांसाठी लागणारी पॅनल्स ही कंपनी बनवते. आर्थिकद़ृष्ट्या अतिशय सुद़ृढ असणार्या या कंपनीची पाच वर्षांची सरासरी आकडेवारी पाहा.
ROCE - 35.1%
ROE - 27.6%
Profit Growth - 117%
22 एप्रिलला कंपनीने आपले आर्थिक निकाल सादर केले. ऑपरेटिंग रेव्हेन्यूमध्ये दरसाल 36.4 टक्के वाढ तर प्रॉफिटमध्ये 35.6 टक्के वाढ कंपनीने नोंदवली. त्यामुळे 23 एप्रिल रोजी हा शेअर 15 टक्के वाढला. शिवाय त्या दिवशी 3100 च्याही पार तो गेला होता. परंतु, नंतरच्या दोन दिवसांत तो 11.5 टक्के घसरून 2676.50 वर बंद झाला आहे.
हा शेअर कोसळण्याचे कारण म्हणजे कंपनीच्या 15 कोटी शेअर्सच्या Lock In Period 25 एप्रिल रोजी संपला. हे काय प्रकरण असते? तर IPO नंतर 90 ते 180 दिवस कंपनीचे प्रमोटर्स, एंजल इन्व्हेस्टर्स, किंवा Institutions यांना त्यांच्याकडील शेअर्स विक्री करण्यास बंदी असते. IPO नंतर लगेचच नजीकच्या काळात शेअरच्या भावात घातक चढ-उतार होऊ नयेत यासाठी ही तरतूद असते. जेव्हा अशा शेअर्सचा लॉक इन पिरीयड संपून ते बाजारात येतात, तेव्हा एकतर ते Profit Booking करतात, नाहीतर त्यांच्या प्रचंड मोठ्या संख्येमुळे भाव लक्षणीयरित्या कोसळतात. कंपनी चांगली असेल तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधीच असते. परंतु, ट्रेडर्सचे या गोष्टीकडे अत्यंत दक्षतेने लक्ष असणे गरजेचे आहे. पुढील काही दिवसांत खालील कंपन्यांच्या शेअर्सचा लॉक इन पिरीयड संपणार आहे.
1) Hari om Pipes - 30 April
2) Dr. Agarwals Halth care - 2 May
3) Deepak Builders & Engineers - 2 May
4) Blue Jet Health - 2 May
5) Afcons Infra - 2 May
6) Honasa Consumer - 5 May
7) Rainbow Child - 6 May
चढ -उतार, तेजी-मंदी ही बाजारात नेहमीच येत असतात. परंतु, शुक्रवारी बाजार कोसळला तो पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या नृशंस हत्याकांडामुळे किंवा त्या हत्याकांडाला जबाबदार धरून भारताने पाकिस्तानबाबत उचललेल्या कठोर पावलामुळे. त्या हत्याकांडाचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. भारताने भूराजकीय कोंडीसह पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे. भारताने सिंधू जल करार रद्द करण्याबरोबरच अटारी सीमा सील करत पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवला आहे. या घोषणेमुळे पाकचा केएसई 100 निर्देशांक 1500 अंकांनी कोसळला. आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानच्या व्यापार कोंडीमुळे एकूण 3800 कोटींचा व्यापार यामुळे ठप्प होणार आहे. यामुळे बाजारावर तणावाची स्थिती असेल.