

* गतसप्ताहात शुक्रवारच्या सत्रात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये अनुक्रमे एकूण 207.35 अंक आणि 588.90 अंकांची घट होऊन दोन्ही निर्देशांक 24039.35 आणि 79212.53 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये शुक्रवारी 0.86 टक्के, सेन्सेक्समध्ये 0.74 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. एकूण सप्ताहाचा विचार करता दोन्ही निर्देशांकांमध्ये सलग वाढ होण्याचा हा दुसरा आठवडा ठरला. या सप्ताहात निफ्टीने 0.79 टक्के, तर सेन्सेक्सने 0.84 टक्क्यांची वाढ दर्शवली. सप्ताहादरम्यान सेन्सेक्सने 80254 अंकांपर्यंत मजल मारली. परंतु, सप्ताहाअखेर दोन्ही निर्देशांक गडगडले. सप्ताहादरम्यान सर्वाधिक वाढ होणार्या समभागामध्ये टेक महिंद्रा (11.9 टक्के), एचसीएल टेक (9.8 टक्के), महिंद्रा अँड महिंद्रा (6.9 टक्के), टाटा मोटर्स (5.4 टक्के), एसबीआय लाईफ (5.4 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला. सर्वाधिक घट होणार्या समभागामध्ये श्रीराम फायनान्स (-5.3 टक्के), अदानी पोर्टस (-5.3 टक्के), भारती एअरटेल (-3.8 टक्के), अदानी एंटरप्राईझेस (-2.6 टक्के), एचडीएफसी लाईफ (-2.2 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला.
* देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे गत आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर. कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 2.4 टक्के वाढून 18951 कोटींवरून 19407 कोटींवर पोहोचला. कंपनीचा महसूल 9.9 टक्के वाढून 2.40 लाख कोटींवरून 2.64 लाख कोटींवर पोहोचला. 10 लाख कोटींचा मालमत्तेचा टप्पा गाठणारी रिलायन्स देशातील पहिली कंपनी ठरली. तसेच 20 लाख कोटींचे भांडवल बाजारमूल्य (मार्केट कॅप) आणि 10 लाख कोटींचा वार्षिक महसुलाचा टप्पा गाठणारी पहिली भारतीय कंपनी म्हणूनदेखील विक्रम रिलायन्सच्या नावावर आहेत.
* गत आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रला 1493 कोटींचा निव्वळ नफा झाला. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत नफ्यात 23 टक्के वाढ झाली. बँकेचे एकूण उत्पन्न 6488 कोटींवरून 7711 कोटींवर पोहोचले. निव्वळ व्याज उत्पन्नाचा (एनआयआय) विचार करता यामध्ये 20.59 टक्क्यांची वाढ होऊन हे उत्पन्न 3116 कोटींवर गेले. निव्वळ व्याज नफा 4.01 टक्के झाला. एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण मागील तिमाहीच्या तुलनेत 1.80 टक्क्यावरून 1.74 टक्के झाले. त्याचप्रमाणे निव्वळ बुडीत कर्जाचे प्रमाण (नेट एनपीए) 0.20 टक्क्यांवरून 0.18 टक्क्यांवर खाली आले.
* भारताने सिंधू जलकरार रद्द केल्याच्या घोषणेनंतर पाकिस्तानचे कराची स्टॉक एक्स्चेंज 100 - निर्देशांक (केएसई 100) 1500 अंकांनी कोसळला. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने भूराजकीय कोंडीसह पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरू केले आहे. भारताने अटारी सीमा सील करण्यासोबतच पाकिस्तान सोबतचा व्यापार थांबवला आहे. एकूण 3800 कोटींचा व्यापार यामुळे ठप्प होणार असून, याचा सर्वाधिक फटका या आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. या आधीच डळमळीत असलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्था वृद्धीदराचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) ने 2.6 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.
* देशातील महत्त्वाची खासगी बँक अॅक्सिस बँकेचा निव्वळ नफा गत आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 0.2 टक्के घटून 7130 कोटींवरून 7117 कोटी झाला. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) 6 टक्के वधारून 13089 कोटींवरून 13811 कोटी झाले. बँकेच्या इतर उत्पन्नात किरकोळ वाढ होऊन इतर उत्पन्न 6766 वरून 6780 कोटींवर गेले. नेट इंटरेस्ट मार्जिन 3.93 टक्क्यांवरून 3.97 पर्यंत वाढले. त्याचप्रमाणे एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 1.43 टक्क्यांवरून 1.28 टक्क्यांवर खाली आले. तसेच निव्वळ बुडीत कर्जाचे प्रमाण (नेट एनपीए) 0.35 टक्क्यांवरून 0.33 टक्क्यांवर आले.
* देशातील सर्वात मोठी चारचाकी उत्पादक कंपनी मारुती सुझुकीचा गत आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचा नफा मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 4.3 टक्के घटून 3711 कोटी झाला. कंपनीचा महसूल 6.4 टक्के वाढून 38235 कोटींवरून 40674 कोटींवर गेला.
* दक्षिण कोरियाची कंपनी ‘सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स’ आपल्या चेन्नईजवळच्या प्रकल्पात 1 हजार कोटींची अधिकची गुंतवणूक करणार. प्रकल्प विस्तारासाठी ही रक्कम वापरली जाणार. सध्या या प्रकल्पात 2 हजार कर्मचारी कार्यरत असून, देशातील एकूण कंपनीच्या व्यवसायातील एक तृतीयांश महसूल या प्रकल्पातून येतो. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा भारतातील व्यवसायाचा महसूल 12 अब्ज डॉलर्स होता.
* खासगी क्षेत्रातील बँक ‘आरबीएल’ बँकेचा गतआर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत 81 टक्के घटून 353 कोटींवरून 69 कोटींवर आला. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्नदेखील 2 टक्के घटून 1600 कोटींवरून 1563 कोटी झाले. नेट इंटरेस्ट मार्जिनदेखील 5.45 टक्क्यांवरून 4.89 टक्क्यांवर खाली आले. अनुत्पादित कर्जे तसेच इतर कारणासाठी कराव्या लागणार्या तरतुदींमध्ये तब्बल (प्रोव्हिजन्स) तब्बल 90 टक्क्यांची वाढ होऊन तरतुदी 785.14 कोटी झाल्या. मायक्रोफायनान्स तसेच क्रेडिट कार्डवर दिलेली कर्जे थकीत झाल्याने अधिकच्या तरतुदी कराव्या लागल्या. या पश्चात बँकेच्या एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) मागील वर्षी असणार्या 2.65 टक्क्यांवरून 2.60 टक्के झाले.
* मुंबईच्या विमानतळावरून दागिने निर्यात सुविधा सुरू होणार. हँड-कॅरेज दागिन्यांची 1 मेपासून मुंबई विमानतळावरून परदेशात निर्यातीला सुरुवात होईल. यासंबंधीचे मॅकड्रील 24 एप्रिल रोजी घेण्यात आले. यामुळे उदयोन्मुख व्यापार्यांना जगाची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रोमोशनल कौन्सिलने यासंदर्भात पाठपुरावा केला. या निर्णयामुळे दागिन्यांची विमानतळावरून आवक जावक (लॉजिस्टिक्स) प्रक्रिया सुलभ होणार आहे. निर्यातदारांना स्वतः विमानतळावरून दागिने जागतिक बाजारपेठेत नेता येतील. हँड कॅरी प्रक्रियेसाठी आणि मार्गदर्शनासाठी जीजेईपीसीचे कार्यालय विमानतळावर सुरू करण्यात आले आहे.
* भारताची विदेश चलन गंगाजळी 18 एप्रिलअखेर तब्बल 8.31 अब्ज डॉलर्सनी वाढून 686.145 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. गंगाजळीत भर पडण्याचा हा सलग सातवा आठवडा होता. सप्टेंबर 2024 मध्ये गंगाजळी विक्रमी 704.885 अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती.