

Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बाजार हिरव्या रंगात उघडला. आज सकाळी निफ्टी 30 अंकांनी वाढून 25696 वर पोहोचला आणि सेन्सेक्स 288 अंकांनी वाढून 83670 वर पोहोचला. बुधवारी, निफ्टी 66 अंकांनी घसरून 25665 वर बंद झाला होता.
आजच्या तेजीचं मुख्य कारण ठरलं ते इन्फोसिसचे दमदार तिमाही निकाल. कंपनीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आल्यामुळे इन्फोसिसच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी झाली. सकाळी इन्फोसिसचा शेअर सुमारे 4% वाढून 1,665 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. विशेष म्हणजे सेन्सेक्समधील टॉप-30 शेअर्समध्ये तो सर्वात मोठा गेनर ठरला. इन्फोसिससोबतच टेक महिंद्रा आणि महिंद्रा अँड महिंद्रा या शेअर्समध्येही चांगली तेजी दिसून आली.
दुसरीकडे काही शेअर्समध्ये नफा वसुलीचा दबाव दिसतोय. इटरनल (Eternal), भारती एअरटेल आणि एशियन पेंट्स हे शेअर्स आज टॉप लूजर्समध्ये आहेत. या शेअर्समध्ये सुमारे 2% पर्यंत घसरण दिसून येत आहे.
सेक्टोरल इंडेक्स पाहिला तर आज आयटी सेक्टरने बाजी मारली आहे. IT इंडेक्समध्ये 2% पेक्षा जास्त तेजी दिसून आली. याशिवाय ऑटो, पीएसयू बँका आणि रिअॅल्टी या सेक्टरमध्येही चांगली वाढ आहे. मात्र फार्मा, मेटल आणि हेल्थकेअर या सेक्टरमध्ये घसरण दिसतेय.
आजच्या ट्रेडिंगमध्ये केवळ इन्फोसिसच नाही, तर अनेक कंपन्यांचे निकाल येणार असल्याने बाजारात हालचाल वाढू शकते. आज फेडरल बँक, विप्रो, रिलायन्स, टाटा टेक्नॉलॉजी यांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे या शेअर्समध्ये दिवसभर चढ-उतार दिसू शकतात.
इन्फोसिसचे दमदार निकाल
आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव कमी होण्याचे संकेत
कच्च्या तेलाच्या किंमती वरच्या पातळीवरून खाली येणे
भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सकारात्मक अपेक्षा
घरगुती फंडांकडून सतत खरेदी सुरू राहणे.
बाजारात तेजी असली तरी सावध राहण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. परदेशी गुंतवणूकदारांची (FII) विक्री पूर्णपणे थांबली आहे असे संकेत नाहीत. तसेच डॉलर मजबूत होत असल्याने काही प्रमाणात दबाव राहू शकतो. याशिवाय गॅप-अप ओपनिंगनंतर बाजारात नफा वसुली होण्याची शक्यता अनेकदा दिसते.