Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी! सेन्सेक्स 1,142 अंकांनी उसळला; गुंतवणूकदारांच्या खात्यात 5 लाख कोटींची भर

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 1,142 अंकांनी वाढून 82,248 वर, तर निफ्टी 293 अंकांनी वधारून 25,337 वर उघडला.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on: 
Updated on: 

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात बुधवारी (11 नोव्हेंबर) आठवड्याची सुरुवात जोरदार तेजीसह झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठी झेप घेतली. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट आणि परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा भारतीय बाजाराकडे वळवलेला मोर्चा यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या तेजीमुळे अवघ्या काही वेळात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 5 लाख कोटी रुपयांची भर पडली.

बाजारातील तेजीची प्रमुख कारणे आणि महत्त्वाचे आकडे

- निफ्टीची जोरदार सुरुवात: बुधवारी सकाळी निफ्टी 293 अंकांच्या वाढीसह 25,337 अंकांवर उघडला. तर सेन्सेक्सने 1,142 अंकांची मोठी झेप घेत 82,248 अंकांवर व्यवहाराला सुरुवात केली.

- गुंतवणूकदारांना 5 लाख कोटींचा फायदा: बाजारातील तेजीमुळे बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य वाढून 511.2 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. यामुळे गुंतवणूकदारांना एकाच वेळी सुमारे 5 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला.

- मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी: मोठ्या कंपन्यांसोबतच मध्यम आणि छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही खरेदीचा जोर दिसला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात अर्ध्या टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली.

- ऑटो आणि बँकिंग क्षेत्र आघाडीवर: औषधनिर्मिती क्षेत्र वगळता जवळपास सर्व क्षेत्रांचे निर्देशांक हिरव्या रंगात होते. ऑटोमोबाईल आणि सरकारी बँकांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सव्वा टक्क्यापर्यंत वाढ झाली.

- सर्व 30 शेअर्समध्ये वाढ: सेन्सेक्समधील सर्व 30 कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. इंडिगो, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एशियन पेंट्स यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सव्वाचार टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली.

परदेशी गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी

भारतीय बाजारातील तेजीमागे परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी हेही महत्त्वाचे कारण आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या नऊ दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 53,739 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे, सलग दोन महिने विक्री केल्यानंतर त्यांनी पुन्हा खरेदी सुरू केली आहे.

Stock Market Today
Radhika Apte: त्या रात्री गोव्यात नेमकं काय घडलं होतं? तुषार कपूरला डेट केल्याच्या चर्चांवर राधिकाचे भन्नाट उत्तर

ऑक्टोबरमध्ये त्यांनी 34,843 कोटी रुपये, तर सप्टेंबरमध्ये 35,861 कोटी रुपये बाजारातून काढले होते. याशिवाय कच्च्या तेलाचे दर घसरून प्रति बॅरल 91 डॉलरवर आले आहेत. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होण्याची शक्यता आहे.

जागतिक बाजारातूनही सकारात्मक संकेत

अमेरिकेतील डाऊ जोन्स निर्देशांक गेल्या दोन दिवसांत 950 अंकांनी, तर नॅस्डॅक 500 अंकांनी वधारला आहे. आशियाई बाजारातही जपानचा निक्केई आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक सुमारे पाऊण टक्क्याने वाढला आहे. सोमवारी निफ्टी 58 अंकांच्या वाढीसह 25,044 वर बंद झाला होता. मंगळवारी बाजार बंद होता.

Stock Market Today
Supriya Sule: 'आजच्या दिवशी तुझं नसणं...', भाऊबीजेच्या दिवशी सुप्रिया सुळे भावुक; अजितदादांच्या आठवणींनी मन हेलावलं, शेअर केला व्हिडिओ

2027 पर्यंत निफ्टी 28 हजारांवर जाण्याचा अंदाज

ब्रोकरेज कंपनी सिटी रिसर्चने भारतीय शेअर बाजाराबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, डिसेंबर 2027 पर्यंत निफ्टी 50 हा 28,000 अंकांचा टप्पा गाठू शकतो. सध्याच्या 25,000 च्या आसपासच्या पातळीवरून ही सुमारे 12 टक्क्यांची वाढ असेल.

कंपन्यांच्या नफ्यात अपेक्षित वाढ, कच्च्या तेलाचे दर कमी होणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरील (AI) गुंतवणुकीचा वेग मंदावण्याची शक्यता यामुळे भारतीय बाजाराला आधार मिळू शकतो. मात्र, बाजारातील चढ-उतार लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी सावधपणे निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.