

Stock Market Today: आठवड्याची सुरुवात देशांतर्गत शेअर बाजारासाठी फारशी चांगली झाली नाही. जागतिक बाजारांकडून मिळालेल्या संमिश्र संकेतांमुळे आज सकाळी बाजार उघडताच विक्रीचा दबाव दिसून आला. ओपनिंगनंतर सेन्सेक्स सुमारे 130 अंकांनी घसरून 82,491 च्या आसपास ट्रेड करत होता, तर निफ्टी जवळपास 50 अंकांनी खाली येत 25,420 च्या पातळीवर पोहोचला.
बँक निफ्टीतही घसरण दिसली आणि तो 159 अंकांनी घसरून 60,027 वर व्यवहार करत होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण होत आहे. स्मॉलकॅप निर्देशांकात तर 1 टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली. याचदरम्यान बाजारातील अस्थिरतेचं मोजमाप करणारा इंडिया VIX तब्बल 3 टक्क्यांनी वाढला, ज्यामुळे पुढील सत्रांमध्ये चढ-उतार वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निफ्टीवरील सेक्टोरल कामगिरी पाहिली तर फार्मा आणि हेल्थकेअर निर्देशांकात तेजी दिसून आली. ऑटो, रिअॅल्टी आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स शेअर्समध्येही खरेदी दिसली.
मात्र IT, NBFC, मीडिया आणि खासगी बँकिंग शेअर्समध्ये विक्रीचा जोर होता. निफ्टी 50 मधील काही मोठ्या शेअर्समध्ये तेजी असताना, अदानी समूहातील काही शेअर्स, IT कंपन्या आणि काही मोठ्या वित्तीय कंपन्यांचे शेअर्स घसरले होते.
शुक्रवारी अमेरिकन बाजारात महागाईचे आकडे अपेक्षेपेक्षा कमी आले असले तरी टेक शेअर्सवर दबाव कायम होता. डाओ थोडासा वाढीसह बंद झाला, तर नॅस्डॅक सलग चौथ्या दिवशी घसरणीसह बंद झाला.
आज अमेरिका, चीन आणि दक्षिण कोरिया येथे बाजार बंद असल्याने जागतिक व्यवहार मर्यादित आहेत. GIFT निफ्टीतही घसरण दिसत असून त्यामुळे देशांतर्गत बाजारावर दबाव कायम राहण्याची शक्यता आहे.
कमोडिटी बाजारात मात्र मोठी हालचाल पाहायला मिळाली. MCX वर सोन्याचा दर जवळपास 3,000 रुपयांनी वाढून 1,56,000 रुपयांच्या आसपास पोहोचला, तर चांदीने तब्बल 8,000 रुपयांची वाढ घेत 2,44,000 रुपयांचा टप्पा ओलांडला.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याने सुमारे 100 डॉलरची झेप घेत 5,050 डॉलरच्या जवळ व्यवहार केला. चांदीत जवळपास 3 टक्क्यांची तेजी होती. दुसरीकडे कच्चं तेल मात्र 68 डॉलरखाली आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या 10 वर्षांच्या बाँड यिल्डमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली असून ती सुमारे 4 टक्क्यांच्या आसपास पोहोचली आहे. याचा जागतिक रिस्क सेंटिमेंटवर परिणाम होऊ शकतो.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) रोख बाजारात सुमारे 7,396 कोटी रुपयांची विक्री केली. फ्युचर्ससह एकूण निव्वळ विक्री 13,000 कोटी रुपयांहून अधिक होती. मात्र देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) सुमारे 5,554 कोटी रुपयांची खरेदी करत बाजाराला काहीसा आधार दिला.
डिसेंबर तिमाहीत काही कंपन्यांनी चांगले निकाल जाहीर केले, तर काहींची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिली. त्यामुळे आज या शेअर्समध्ये चढ-उतार पाहायला मिळू शकतो.
याशिवाय Reserve Bank of India ने Bain Capital ला Manappuram Finance मध्ये 41.7% हिस्सा खरेदी करण्यास मंजुरी दिल्याने संबंधित शेअरवर लक्ष राहणार आहे. ही डील सुमारे 4,385 कोटी रुपयांची आहे.
आज Fractal Analytics या कंपनीची शेअर बाजारात लिस्टिंग होत असून, हा इश्यू अडीच पटाहून अधिक सब्सक्राइब झाला होता. इश्यू प्राइस 900 रुपये ठेवण्यात आली होती. लिस्टिंग प्रीमियमवर होते की डिस्काउंटवर, याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष आहे.
दिल्लीमध्ये आजपासून ‘India AI Impact Summit’ या आंतरराष्ट्रीय AI परिषदेला सुरुवात होत आहे. पंतप्रधान मोदी संध्याकाळी या परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. 15 देशांचे प्रतिनिधी आणि 40 हून अधिक CEOs या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने टेक आणि AI आधारित शेअर्समध्ये हालचाल दिसू शकते.