

Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात झाली. सेन्सेक्स 280 अंकांनी वाढला, तर निफ्टी 40 अंकांनी वाढला. आजच्या व्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) आणि एशियन पेंट्स सारख्या दिग्गज शेअर्सनी बाजाराला आधार दिला. तर हिंडाल्को, ग्रासिम, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स आणि इटरनल यांसारख्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. ब्रॉडर मार्केटमध्ये रेंजबाउंड ट्रेडिंग सुरू असून गुंतवणूकदार निवडक खरेदीवर भर देत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातील मिश्र संकेत, कंपन्यांचे तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे बाजारात अस्थिरता आहे. मंगळवारी एफआयआयने (FII) सलग पाचव्या दिवशी ₹7,761 कोटींची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) सलग 48व्या दिवशी ₹1,200 कोटींची खरेदी करून सहा वर्षांचा विक्रम केला आहे.
Nikkei आणि इतर आशियाई बाजारातील तेजीमुळे भारतीय बाजारात सकाळी सकारात्मक वातावरण होते. डॉलरचा वाढता कल आणि बाँड यिल्डमध्ये होणारी वाढ ही जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांची चिंता आहे. गुंतवणूकदार सध्या IT, हेल्थकेअर आणि कंझ्युमर सेक्टरमधील शेअर्सवर लक्ष केंद्रित करत आहेत.
अमेरिकन शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या तेजीनंतर बुधवारी किरकोळ घसरण दिसली.
Dow Jones 25 अंकांनी खाली, तर Nasdaq 335 अंकांनी घसरला. त्याच वेळी GIFT Nifty सकाळी 30 अंकांच्या वाढीसह 25,750 च्या आसपास व्यवहार करत होता, आणि Nikkei इंडेक्स 600 अंकांनी वाढला होता. डॉलर इंडेक्स सलग पाचव्या दिवशी वाढून 100 च्या वर पोहोचला.
ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा IPO पहिल्याच दिवशी 57% सबस्क्राइब झाला आहे. या IPO चा प्राइस बँड ₹95–₹100 ठेवण्यात आला असून, तज्ज्ञांनी तो लिस्टिंग गेनसाठी आकर्षक असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, Orkla India चा चर्चेत असलेला IPO 49 पट सबस्क्राइब झाला असून, आज तो ₹730 च्या इश्यू प्राइसवर बाजारात लिस्ट होणार आहे.