

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजाराची आज मंगळवारी (4 नोव्हेंबर) संथ सुरुवात झाली. निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजार मर्यादित रेंजमध्ये सुरू झाला असून, सेन्सेक्स सुमारे 60 अंकांनी तर निफ्टी 10 अंकांनी वर व्यवहार करत होता. मात्र बँक निफ्टीमध्ये थोडी घसरण दिसली.
जागतिक आणि स्थानिक संकेतांमुळे गुंतवणूकदार सध्या सावध भूमिका घेत आहेत. परदेशी बाजारातील हालचाली, देशातील कंपन्यांचे तिमाही निकाल आणि डॉलर इंडेक्सची हालचाल, हे सर्व घटक सध्या गुंतवणुकीचा मूड ठरवत आहेत.
काल अमेरिकन बाजारांमध्ये डाऊ जोन्स निर्देशांक 226 अंकांनी घसरला, तर नॅस्डॅक 109 अंकांनी वाढला. एस अँड पी 500 निर्देशांक किरकोळ वाढीसह बंद झाला. टेक्नॉलॉजी शेअर्समधील खरेदीमुळे बाजाराला थोडा आधार मिळाला, परंतु बँकिंग शेअर्सवर दबाव कायम राहिला.
गिफ्ट निफ्टी आज सकाळी 23,100च्या आसपास स्थिर व्यवहार करत होता, ज्यावरून भारतीय बाजारातही फ्लॅट ओपनिंगची शक्यता होती. जपानचा निक्केई निर्देशांक 52,500च्या उच्चांकावर पोहोचला आहे आणि या वर्षी आतापर्यंत 32% ने वाढला आहे. अमेरिकन निर्देशांकही वर्षाच्या सुरुवातीपासून 11 ते 24 टक्क्यांनी वधारला आहे.
कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदी दोन्हीही सध्या सुस्तच आहेत. सोन्याचा भाव स्थिर आहे तर चांदी किंचित घसरली आहे. क्रूड ऑइल डॉलर 65 प्रति बॅरलच्या आसपास स्थिर आहे.
डॉलर इंडेक्स सलग पाचव्या दिवशी वाढून 99.70 च्या वर बंद झाला. हा तीन महिन्यांतील उच्चांक आहे. तरीही वर्षभरात डॉलर इंडेक्स 8% नी घसरला आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत ₹88.78/$ वर बंद झाला.
भारती एअरटेल – निकाल प्रभावी, अपेक्षेपेक्षा चांगले
टायटन – निकाल मिश्र स्वरूपाचे
पॉवर ग्रिड – निकाल घसरले
आज SBI, M&M, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि इंटरग्लोब एव्हिएशन (IndiGo) यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत.
परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) मंगळवारी सुमारे ₹4,070 कोटींची निव्वळ विक्री केली.
तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) सलग 47व्या दिवशी खरेदी कायम ठेवली, ज्यामुळे बाजाराला काही प्रमाणात आधार मिळाला.