

Amazon Layoff 2025: जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात झाली आहे. कंपनीने जगभरातील सुमारे 14,000 कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरून कमी केलं आहे. पण या वेळी कर्मचाऱ्यांना नोकरी गेल्याची माहिती देण्याची पद्धत सगळ्यांना धक्का देणारी आहे.
सकाळी झोपेतून उठताच कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर एकामागून एक दोन मेसेज आले — पहिला मेसेज वाचताच त्यांना समजलं की त्यांची नोकरी गेली आहे. कंपनीने हा निर्णय आपल्या "व्यवस्थापन आणि इनोवेशन वाढवण्याच्या" धोरणाचा भाग असल्याचं सांगितलं आहे.
रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांना सकाळी एक मेसेज आला ज्यात लिहिलं होतं की ऑफिसला येण्यापूर्वी आपला ई-मेल तपासा. काही मिनिटांनी दुसरा मेसेज आला. ज्यात हेल्पडेस्कचा नंबर आणि पुढील प्रक्रिया सांगितली होती. या मेसेजेसनंतरच कर्मचाऱ्यांचे ऑफिस आयडी बॅज निष्क्रिय करण्यात आले, म्हणजेच ते कामावर पोहोचले तरी प्रवेश मिळत नव्हता.
या कपातीचा सर्वाधिक फटका रिटेल मॅनेजमेंट टीमला बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेझॉनमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचं धोरण सुरु आहे. कंपनीचं म्हणणं आहे की हा निर्णय व्यवसाय अधिक वेगाने वाढवण्यासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) सहाय्याने कामाला गती देण्यासाठी घेण्यात आला आहे.
अमेझॉनने टेक्स्ट मेसेजद्वारे लेऑफची माहिती देण्याची पद्धत अवलंबल्याने जगभरात चर्चा सुरू झाली आहे. याआधी Google आणि Tesla सारख्या मोठ्या टेक कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारे अचानक कामावरून कमी केल्याची उदाहरणं आहेत. बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, अमेझॉनने हा निर्णय अमेरिकेतील ऑफिसमध्ये गोंधळ टाळण्यासाठी घेतला.
अमेझॉनच्या HR प्रमुख बेथ गॅलेटी यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या नोटमध्ये सांगितलं की, लेऑफ झालेल्या कर्मचाऱ्यांना 90 दिवसांचा पूर्ण पगार, त्यासोबत निवृत्ती पॅकेज आणि जॉब प्लेसमेंट सहाय्य दिलं जाईल. त्यांनी सांगितलं, “हा निर्णय सोपा नव्हता, पण कंपनी या संक्रमण काळात कर्मचाऱ्यांसोबत राहील.”
बेथ गॅलेटी यांनी स्पष्ट सांगितलं की, AI आणि ऑटोमेशनमुळे कंपनीच्या कार्यपद्धतीत मोठा बदल होत आहे. “जग झपाट्याने बदलत आहे आणि आम्हालाही त्यानुसार बदलाव लागेल,” असं त्यांनी म्हटलं.