

Stock Market Today: सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज मंगळवारी (27 जानेवारी) शेअर बाजाराने सुरुवातीला सकारात्मक सुरुवात केली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी हिरव्या रंगात ओपनिंग केली. मात्र ही वाढ फार काळ टिकली नाही आणि काही वेळातच बाजारात जोरदार चढ-उतार पाहायला मिळाले.
सुरुवातीला सेन्सेक्स सुमारे 95 अंकांच्या वाढीसह 81,600 च्या आसपास व्यवहार करत होता, तर निफ्टी 25,000 च्या वर गेला होता. पण मंथली एक्सपायरीमुळे बाजारात अचानक अस्थिरता वाढली. काही वेळातच निफ्टी सुमारे 110 अंकांनी घसरला, तर सेन्सेक्समध्ये जवळपास 400 अंकांची घसरण झाली. यावेळी India VIX तब्बल 13 टक्क्यांनी वाढला, म्हणजेच बाजारातील घसरण वाढल्याचं चित्र दिसून आलं.
आजच्या व्यवहारात मेटल शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. मेटल इंडेक्स 2 टक्क्यांहून अधिक वाढला. याउलट ऑटो शेअर्समध्ये विक्रीचा दबाव होता. बँक निफ्टीनेही सुरुवातीची वाढ गमावली आणि खाली आला. ओपनिंग लेव्हल्स पाहिल्या तर सेन्सेक्स किंचित घसरणीसह उघडला, निफ्टी किंचित वाढीसह सुरू झाला, तर बँक निफ्टी घसरणीसह उघडला होता.
चलन बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत 18 पैशांनी मजबूत होत 91.76 प्रति डॉलरवर उघडला. जागतिक बाजारांकडून संमिश्र संकेत मिळत असले तरी GIFT निफ्टीमध्ये 100 अंकांहून अधिक वाढ दिसून आली, ज्यामुळे सुरुवातीला बाजाराचा मूड सकारात्मक वाटत होता.
आज भारत आणि युरोपियन युनियनमधील महत्त्वाच्या व्यापार कराराची घोषणा होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी वाणिज्य मंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे. या कराराअंतर्गत युरोपियन कारवरील आयात शुल्क मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात, अशी चर्चा आहे. याशिवाय अमेरिकेकडूनही टॅरिफबाबत दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. या घडामोडींमुळे बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे.
कमकुवत डॉलर आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या वाढलेल्या मागणीमुळे सोने आणि चांदीने नवे विक्रम केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने नवा उच्चांक गाठला, तर चांदीत मोठी वाढ पाहायला मिळाली. देशांतर्गत बाजारातही सोने आणि चांदी दोन्ही ऑल-टाइम हाय पातळीवर पोहोचले.
परदेशी गुंतवणूकदारांकडून (FII) विक्रीचा ओघ सुरूच आहे. मागील व्यवहारात त्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर्स विकले. मात्र याचवेळी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदार (DII) सातत्याने खरेदी करत असून, त्यांनी बाजाराला चांगला आधार दिला आहे. देशांतर्गत पैसा बाजारातील घसरण रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.