

Why Stock Market Crash Today: देशांतर्गत शेअर बाजारात आज जोरदार घसरण पाहायला मिळाली. सकाळी बाजाराने सकारात्मक सुरुवात केली होती, पण काही वेळातच परिस्थिती बदलली आणि विक्रीचा जोर वाढला. परिणामी सेन्सेक्स 800 अंकांहून अधिक घसरला, तर निफ्टीही जोरदार आपटला. दुपारी 2.23 वाजताच्या सुमारास सेन्सेक्स 800.52 अंकांनी (0.97%) घसरून 81,506.85 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 240.10 अंकांनी (0.95%) घसरून 25,049.80 पर्यंत खाली आला.
या घसरणीचा थेट फटका गुंतवणूकदारांना बसला. बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (मार्केट कॅप) 5.7 लाख कोटींनी कमी झाले. त्यामुळे बीएसईवरील एकूण मार्केट कॅप 452.69 लाख कोटींवर आले. म्हणजेच काही तासांतच बाजारातून लाखो रुपये गायब झाले.
आजचा बाजार तेजीसह उघडला, सेन्सेक्स 82,335 च्या आसपास होता आणि काही वेळात तो 82,516 पर्यंतही गेला. पण ही तेजी फार काळ टिकली नाही. बाजार वरच्या पातळीवर गेल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा वसुली (Profit Booking) सुरू केली. त्यामुळे खरेदीपेक्षा विक्रीचा जोर वाढला आणि बाजार घसरला.
बाजारावर दबाव येण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांची (FII) सततची विक्री. FII कडून मोठ्या प्रमाणात पैसे बाहेर गेले की बाजाराचा मूड बदलतो आणि त्याचा परिणाम मोठ्या निर्देशांकांवर होतो.
जागतिक बाजारातून काही सकारात्मक संकेत असूनही भारतीय बाजारात अनिश्चितता कायम असल्याचं चित्र आहे. आज सकाळी आशियाई बाजारांमध्ये तेजी होती, पण देशांतर्गत पातळीवर नफा वसुली आणि FII विक्रीमुळे बाजारावर दबाव आला.
आज शेअर बाजाराने चांगली सुरुवात केली होती, पण वरच्या पातळीवर नफा वसुली आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 800 अंकांनी घसरला आणि निफ्टीही खाली आला. यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 5.7 लाख कोटींचे नुकसान झाले.