

Stock Market Today: काल साप्ताहिक एक्सपायरीदरम्यान झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात सावध झाली. जागतिक बाजारांकडून संमिश्र संकेत मिळाल्याने बाजार सुरुवातीला सुस्त होता. प्रमुख निर्देशांक काही काळ लाल आणि हिरव्या रंगात होते, मात्र थोड्याच वेळात त्यात किरकोळ वाढ दिसून आली.
सकाळी सुमारे 9:25 वाजता सेन्सेक्स 180 अंकांच्या वाढीसह 84,863च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी 60 अंकांनी वाढून 25,919 वर पोहोचला, तर बँक निफ्टी 45 अंकांच्या वाढीसह 59,080च्या पातळीवर होता.
आज बँकिंग आणि NBFC क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. मेटल शेअर्समध्येही खरेदीचा कल होता. निफ्टी 50 मध्ये श्रीराम फायनान्स, इटरनल, आयशर मोटर्स, एसबीआय, हिंदाल्को, अॅक्सिस बँक आणि बजाज फायनान्स या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. दुसरीकडे ICICI बँक, नेस्ले इंडिया, HDFC बँक, मॅक्स हेल्थकेअर, HDFC लाईफ, ट्रेंट आणि इंडिगो या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
बाजारावर परिणाम करणाऱ्या घटकांकडे पाहिले तर जागतिक संकेत कमकुवत आहेत. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FII) सुरू असलेली सलग विक्री आणि रुपयाची ऐतिहासिक घसरण यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. मात्र कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली मोठी घसरण आणि सोन्यातील तेजी काही क्षेत्रांसाठी दिलासा देणारी ठरू शकते.
बाजार उघडण्यापूर्वी GIFT निफ्टी सुमारे 25,950च्या आसपास सपाट व्यवहार करत होता, त्यामुळे देशांतर्गत बाजारात घसरणीचे संकेत मिळत होते. आशियाई बाजारांमध्येही स्पष्ट दिशा दिसून आली नाही, तर डाऊ फ्युचर्स सुमारे 50 अंकांनी घसरला होता.
अमेरिकेतील रोजगारविषयक कमकुवत आकडेवारीमुळे वॉल स्ट्रीटवर चढ-उतार दिसून आले. डाऊ निर्देशांक सुमारे 300 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेतील बेरोजगारी दर वाढून 4.6 टक्क्यांवर गेला, जो गेल्या चार वर्षांतील उच्चांक आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड 59 डॉलरच्या खाली बंद झाला, जो फेब्रुवारी 2021 नंतरचा नीचांकी स्तर आहे. पुरवठा वाढण्याच्या शक्यतेमुळे तेलावर दबाव आहे. दुसरीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात तेजी दिसून आली. जागतिक बाजारात सोने सुमारे 4,350 डॉलरच्या आसपास, तर चांदी 64 डॉलरच्या वर पोहोचली. देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर वाढले, तर चांदीत किरकोळ घसरण झाली.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सलग 14व्या दिवशी विक्री करत सुमारे 2,400 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. कॅश, इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्स मिळून एकूण निव्वळ विक्री सुमारे 7,390 कोटी रुपयांची होती. मात्र देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) सलग 77व्या दिवशी खरेदी करत 1,077 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि बाजाराला आधार दिला.