

Fact Check Bride Meets Ex Two Hours Before Wedding: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लाल रंगाचा पोशाख घातलेली एक तरुणी दिसत आहे. लग्नाला अवघे काही तास उरले असताना ती आपल्या एका मैत्रिणीसोबत एक्स-बॉयफ्रेंडला भेटायला चालली आहे, असा दावा या व्हिडीओत केला आहे. अनेक युजर्स तसेच काही डिजिटल न्यूज माध्यमांनी हा व्हिडीओ सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा करत तो शेअर केला.
X (पूर्वीचे ट्विटर) वरील @venom1s या हँडलने हा व्हिडीओ खरा असल्याचे सांगत पोस्ट केला. “तिचं लग्न होणार आहे, तरीही ती आपल्या प्रियकराला भेटायला गेली. समाजात असे अनेक प्रकार घडतात. काही मुली लग्नाआधी तर काही लग्नानंतरही प्रियकराशी संपर्कात राहतात,” असे त्याने लिहिले आहे. ही पोस्ट खूप जास्त व्हायरल झाली आहे.
या व्हिडीओच्या आधारे अनेक मोठ्या माध्यमांनी आकर्षक मथळ्यांसह बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यातील काही मथळे असे होते—
नवभारत टाइम्स: 1. लग्नासाठी उरले होते फक्त दोन तास, तेवढ्यात वधूने घेतला असा निर्णय की लोकांना...
रिपब्लिक भारत: लग्नाच्या दोन तास आधी वधूला आठवला Ex BF, लाल साडी घालून पोहोचली भेटायला; पुढे जे घडलं ते पाहून....
TV9 भारतवर्ष: लग्नाआधी दोन तास Ex ला भेटायला पोहोचली वधू, मैत्रिणीला म्हणाली – प्लीज शेवटची भेट घडवून आण…
झी न्यूज: लग्नाच्या दोन तास आधी चोरून Ex-बॉयफ्रेंडला भेटायला गेलेली वधू, रस्त्यातच मारली मिठी; व्हिडीओ व्हायरल
न्यूज 18 इंडिया: लग्नाआधी दोन तास Ex बॉयफ्रेंडला भेटायला गेलेली वधू, लाल जोडा घालून मिठी मारत रडताना दिसली; पाहा व्हिडीओ
इन्स्टाग्रामवरही हा व्हिडीओ सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा करत मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. कंटेंट क्रिएटर विनय शर्मा, द मीम ह्यूमर पेज तसेच MMS न्यूज़24, स्टेट मिरर हिन्दी, द ब्रीफ़ इंडिया, बनारस ग्लोबल टाइम्स, भारत समाचार, इंडिया फ़ीड 24×7 यांसारख्या डिजिटल माध्यमांनीही याच दाव्यांसह हा व्हिडीओ प्रसिद्ध केला.
ऑल्ट न्यूजने या व्हायरल व्हिडीओचे काही की-फ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्चद्वारे तपासले. तपासात हा व्हिडीओ आरव मावी (@chalte_phirte098) या भारतीय कंटेंट क्रिएटरच्या यूट्यूब चॅनेल आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर 13 डिसेंबर 2025 रोजी अपलोड करण्यात आल्याचे आढळले. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “प्लीज, शेवटची भेट घडवून आण” असे लिहिले होते. मात्र, व्हिडीओ खरा आहे की स्क्रिप्टेड, याबाबत कोणतेही डिस्क्लेमर देण्यात आले नव्हते. आरव मावीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या व्हिडीओला 6 कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज आणि 21 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
आरव मावीच्या इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अकाउंट तपासल्यावर असे लक्षात आले की त्यांच्या प्रोफाइलवर रिलेशनशिपमधील फसवणूक, ब्रेकअप आणि प्रेमकथांवर आधारित अनेक स्क्रिप्टेड व्हिडीओ आधीपासूनच अपलोड आहेत. त्याच्या यूट्यूब चॅनेलवरील डिस्क्लेमरमध्ये “दिल टूटने के दर्द को अमर कहानियों में बदलना.” असे लिहिलेले आहे. तसेच तो लोकांना त्यांची पर्सनल माहिती त्याच्यासोबत शेअर करण्याचे आवाहनही करतो.
हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आरव मावीने एका व्हिडीओद्वारे स्पष्टीकरण दिले. लोकांकडून आलेल्या माहितीवरून तो संदर्भ घेतो आणि त्यावर आधारित व्हिडीओ तयार करतो, असे त्याने सांगितले. नवरीचा व्हिडीओही अशाच एका माहितीवर आधारित असून तो पूर्णतः क्रिएट केलेला सीन आहे, असे त्याने स्पष्ट केले. मात्र, हा व्हिडीओ इतका मोठ्या प्रमाणात व्हायरल होईल आणि माध्यमांकडूनही वापरला जाईल, याची आपल्याला कल्पना नव्हती, असे आरवने म्हटले आहे.
यानंतर आरवने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “हा व्हिडिओ सत्य घटनेवर आधारित आहे. हा व्हिडीओ फक्त जनजागृती आणि लोकांच्या भावना मांडण्यासाठी तयार करण्यात आला आहे.” सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे. मात्र, अनेक युजर्स आणि काही प्रमुख न्यूज चॅनेल्सनी कोणतीही पडताळणी न करता तो खरा व्हिडीओ समजून व्हायरल केला.