

Stock Market Today: आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स सुमारे 100 अंकांनी घसरलेला दिसला, तर निफ्टीतही घसरण होती आणि तो 26,150 च्या आसपास व्यवहार करत होता. आयटी क्षेत्रात आजही विक्री झाली.
ओपनिंग आकड्यांकडे पाहिल्यास, सेन्सेक्स मागील बंद भावापेक्षा थोडा वर 85,533 वर उघडला, निफ्टी 26,170 च्या आसपास सुरू झाला, तर बँक निफ्टीत किंचित वाढ दिसून आली. चलन बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत थोडा मजबूत होत 89.56 प्रति डॉलरवर उघडला.
जागतिक बाजारांकडून आज स्थिर संकेत मिळाले. अमेरिकन बाजार सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद झाले. GDP आकडे आल्यानंतर डॉलरवर दबाव दिसला आणि त्याचा फायदा कमोडिटीज बाजारांना झाला. दुसरीकडे, सोन्या-चांदीने नवा उच्चांक गाठला, ज्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे कल वाढल्याचं दिसतं. GIFT निफ्टीत सुमारे 35 अंकांची वाढ दिसून आली, त्यामुळे बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज काही विश्लेषक व्यक्त करत आहेत.
आज सोन्या चांदीच्या भावात जोरदार तेजी पाहायला मिळाली. देशांतर्गत बाजारात सोने सुमारे 1 लाख 38 हजार 500 रुपयांपर्यंत पोहोचून उच्चांकाच्या जवळ आहे. चांदीनेही सुमारे 2 लाख 20 हजार रुपयांचा नवा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर कमकुवत झाल्यामुळे आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीमुळे सोन्या चांदीच्या भावात वाढ झाली.
अमेरिकेची तिसऱ्या तिमाहीतील GDP वाढ अपेक्षेपेक्षा जास्त राहिली. बाजाराला सुमारे 3.2 टक्के वाढीची अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात ती 4 टक्क्यांहून अधिक झाली. ग्राहक खर्च आणि गुंतवणूक वाढल्यामुळे ही वाढ झाली.
देशांतर्गत बाजारात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) कॅश सेगमेंटमध्ये विक्री केली, तरी डेरिव्हेटिव्हसह एकूण व्यवहार पाहता त्यांची निव्वळ खरेदी सुरूच आहे. देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) सलग 82व्या दिवशी खरेदी करत बाजाराला आधार दिला.
बाजारासाठी मोठी सकारात्मक बातमी म्हणजे रिझर्व्ह बँकेने बँकिंग सिस्टिममध्ये सुमारे 2 लाख कोटी रुपये टाकण्याची घोषणा केली आहे. 29 डिसेंबर ते 12 जानेवारीदरम्यान सरकारी बाँड खरेदी करून ही रक्कम प्रणालीत आणली जाणार आहे. त्यामुळे कर्जपुरवठा आणि बाजारातील रोखता सुधारण्याची शक्यता आहे.
आजपासून BSE Bankex निर्देशांकात काही बँकांचा समावेश होणार आहे, त्यामुळे त्या शेअर्समध्ये व्यवहार वाढू शकतात. तसंच, गुजरात किडनी अँड सुपर स्पेशालिटी या कंपनीचा IPO आज बंद होत असून त्याला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.