

Pune NCP Alliance: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग येताच प्रशांत जगताप लवकरच राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजीनाम्यानंतर प्रशांत जगताप हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासंदर्भात प्रशांत जगताप यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि काँग्रेसच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काल रात्री दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली असून आगामी निवडणुका एकत्र लढवण्याबाबत दोन्ही बाजूंमध्ये एकमत झालं आहे.
“जागावाटपासाठी दोन्ही पक्षांनी दोन-दोन पावलं मागे घेण्याची तयारी दाखवली होती. कालच्या बैठकीला प्रशांत जगताप उपस्थित नव्हते. मात्र पुढील टप्प्यात विशाल तांबे आणि वंदना चव्हाण यांच्यासोबत बैठक होणार आहे,” असं सुभाष जगताप यांनी स्पष्ट केलं.
सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची युती येत्या 25 किंवा 26 तारखेला अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता आहे. या घोषणेनंतरच राजकीय समीकरणं अधिक स्पष्ट होतील. मात्र या आधीच काही नेत्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत असून प्रशांत जगताप यांचा संभाव्य राजीनामा ही त्याचाच एक भाग मानला जात आहे.
प्रशांत जगताप हे सुरुवातीपासूनच शरद पवार गटाशी एकनिष्ठ असणारे नेते मानले जात होते. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळेच ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांशीही त्यांनी संवाद साधल्याची माहिती समोर येत आहे.
दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य युतीमुळे राज्यातील राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मात्र या प्रक्रियेत काही नेते पक्ष सोडण्याची किंवा नवे पर्याय शोधण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशांत जगताप यांचा निर्णय आणि 25 -26 तारखेला होणारी युतीची अधिकृत घोषणा याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.