

Stock Market Today: आज शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. टॅरिफबाबत सुरू असलेली अनिश्चितता आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे वाढलेली भीती याचा थेट परिणाम बाजारावर दिसून आला. निफ्टीची मंथली एक्सपायरी असतानाच बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. निफ्टी सुरुवातीला 25,641 वर उघडला, तर सेन्सेक्स 83,052 पर्यंत घसरला. काही मिनिटांतच निफ्टीमध्ये 150 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 25,600 च्या खाली घसरला.
सेक्टोरल इंडेक्सकडे पाहिल्यास मेटल्स वगळता जवळपास सर्वच सेक्टर्स लाल रंगात होते. विशेषतः आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री दिसून आली. अमेरिकेत IBM चा शेअर एका दिवसात तब्बल 13 टक्क्यांनी कोसळल्यानंतर भारतातील आयटी कंपन्यांवरही दबाव वाढला. यामागे Anthropic या कंपनीच्या नव्या एआय टूलमुळे पारंपरिक आयटी बिझनेसला फटका बसणार अशी भीती व्यक्त केली जात आहे.
याचा थेट फटका भारतीय आयटी इंडेक्सला बसला आणि तो जवळपास 3 टक्क्यांनी घसरला. ऑटो इंडेक्समध्ये सुमारे 0.65 टक्के, तर रिअॅल्टीमध्ये जवळपास 0.90 टक्के घसरण झाली.
निफ्टी 50 मधील कामगिरी पाहिली तर ONGC, कोल इंडिया आणि JSW स्टील हे काही मोजके शेअर्स हिरव्या रंगात होते. मात्र दुसऱ्या बाजूला ETERNAL, HCL टेक, Infosys, टेक महिंद्रा आणि Tata Consultancy Services या मोठ्या आयटी शेअर्समध्ये 4 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
तांत्रिक पातळीबाबत Samco Securities चे टेक्निकल अॅनालिस्ट ओम मेहरा यांनी सांगितले की, निफ्टीसाठी 25,600 हा सपोर्ट आहे. तर वरच्या बाजूला 25,820 हा पहिला आणि 25,950 दुसरा रेसिस्टन्स आहे. दीर्घकालीन दृष्टीने 25,300 च्या आसपासचा 200-दिवसांचा मूव्हिंग अॅव्हरेज हा मजबूत आधार मानला जात आहे.
दरम्यान, जागतिक बाजारातील हालचालींचाही भारतावर परिणाम होत आहे. HDFC Securities चे प्राइम रिसर्च प्रमुख देवर्ष वकील यांनी सांगितले की, अमेरिकन बाजारात एआयविषयक अपडेट्स आणि ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे दुहेरी दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतीय बाजार सध्या पूर्णपणे ग्लोबल सेंटिमेंटवर अवलंबून असल्याचे चित्र आहे.
अमेरिकेत डाओ जोन्समध्ये अलीकडच्या काळातील मोठी घसरण झाली असून, त्यामागे ट्रम्प यांच्या विसंगत टॅरिफ वक्तव्यांबरोबरच एआयमुळे आयटी कंपन्यांच्या भवितव्याबाबत निर्माण झालेली चिंता कारणीभूत ठरत आहे. पुढील काळात ईराणशी संबंधित घडामोडी हाही बाजारासाठी मोठा ट्रिगर ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
एकूणच बाजाराचा सेट-अप पुन्हा एकदा निगेटिव्ह झोनमध्ये गेला आहे. आज मंथली एक्सपायरी असल्याने अस्थिरता आणखी वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, निफ्टीसाठी 25,575 ते 25,625 हा सध्याचा महत्त्वाचा सपोर्ट झोन असून, त्याखाली 25,375 ते 25,475 या पातळीवर जोरदार खरेदी दिसू शकते. वरच्या बाजूला 25,765 ते 25,875 हा रेसिस्टन्स झोन राहील, तर 25,900 ते 26,000 च्या आसपास पुन्हा विक्रीचा दबाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.