

Stock Market Today: आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी बाजारात सुरुवातीपासूनच दबाव दिसून आला. निफ्टी 22 अंकांनी घसरून 23,195 अंकांवर, तर सेन्सेक्स 154 अंकांच्या घसरणीसह 74,182 अंकांवर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी 23,200 अंकांच्या आसपास व्यवहार करताना दिसत आहे.
याआधी बुधवारी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. निफ्टी 99 अंकांनी वाढून 23,217 अंकांवर, तर सेन्सेक्स 332 अंकांच्या वाढीसह 74,336 अंकांवर बंद झाला होता. मात्र, आज बाजार उघडताच पुन्हा एकदा सावध वातावरण पाहायला मिळाले.
भारतीय रुपयाच्या घसरणीचे सत्र आजही कायम आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 3 पैशांनी घसरुन 95.99 रुपये प्रति डॉलर या पातळीवर उघडला. रुपयातील घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून येत आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने तीन वर्षांनंतर व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. या निर्णयाचा जागतिक बाजारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष आता अमेरिकेच्या व्याजदर धोरणासोबतच पुढील संकेतांकडे लागले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत चर्चेचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे, सौदी अरेबियाने तेलाचा पुरवठा लवकरच पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे.
काही काळापूर्वी 109 डॉलरच्या वर गेलेले कच्चे तेल आता 106 डॉलरच्या आसपास व्यवहार करत आहे. सौदी अरामकोकडून ईस्ट-वेस्ट पाइपलाइन पुढील सहा आठवड्यांत पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच, काही दिवसांत या पाइपलाइनमधून अंशतः तेलपुरवठा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यामुळे कच्च्या तेलाच्या दरातील तेजीला काही प्रमाणात ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणसोबत चर्चेचे संकेत आणि सौदीच्या पाइपलाइनमधून पुरवठा पूर्ववत होण्याच्या अपेक्षेमुळे तेलाच्या किमतीवर दबाव आला आहे.
बाजारातील जाणकारांच्या मते, नजीकच्या काळात कच्च्या तेलाच्या किमतीतील हालचाली शेअर बाजारासाठी महत्त्वाचा घटक ठरू शकतात. तेलाच्या किमतीत वाढ झाल्यास महागाई आणि कंपन्यांच्या खर्चावर दबाव येऊ शकतो, तर तेलाच्या दरात नरमाई आल्यास बाजाराला काहीसा दिलासा मिळू शकतो.
सध्या कच्चे तेल 106 डॉलरच्या आसपास असल्याने 110 डॉलरची पातळी पुन्हा गाठणार का, याकडे बाजाराचे लक्ष आहे.
SAMCO Securitiesचे टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट ओम मेहरा यांच्या मते, बुधवारी निफ्टी जवळपास अर्ध्या टक्क्याने वाढून 23,217 अंकांवर बंद झाला. मात्र, निफ्टी अद्याप 20, 50, 100 आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या खाली व्यवहार करत आहे.
निफ्टी सध्या ओव्हरसोल्ड झोनमध्ये असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुढील व्यवहारात बाजारात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.
निफ्टीसाठी 23,100 ही महत्त्वाची सपोर्ट पातळी मानली जात आहे. त्याखाली 23,070 हा पुढील सपोर्ट आहे. दुसरीकडे, बाजारात रिकव्हरी झाल्यास 23,350 ही पहिली अडथळ्याची पातळी असून, त्यानंतर 23,400 ही पुढील रेसिस्टन्स पातळी ठरू शकते.
त्यामुळे गुरुवारच्या व्यवहारात 23,100 ते 23,400 या पातळ्यांवर निफ्टीची हालचाल महत्त्वाची ठरणार आहे. तसेच कच्च्या तेलाचे दर, रुपयाची स्थिती आणि जागतिक बाजारातील संकेत यांचा भारतीय शेअर बाजारावर प्रभाव राहण्याची शक्यता आहे.