

Stock Market Today: आज देशांतर्गत शेअर बाजारांनी दमदार सुरुवात करत गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवला. जागतिक संकेत, संस्थात्मक गुंतवणूकदारांची आक्रमक खरेदी आणि कमोडिटी बाजारातील हालचाली या पार्श्वभूमीवर बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून आले.
सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे 270 अंकांनी वाढून 82,545 च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टीही 75 अंकांनी वाढून 25,558 व्यवहार करत होता. बँक निफ्टीत जवळपास 150 अंकांची तेजी होती. विशेष म्हणजे आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली आणि आयटी निर्देशांक सुमारे 1 टक्क्यांनी वधारला. इतर बहुतांश सेक्टोरल निर्देशांकही हिरव्या रंगात होते.
मागील सत्रात परदेशी आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने बाजाराला आधार मिळाला. एफआयआयने कॅश मार्केट, इंडेक्स फ्युचर्स आणि स्टॉक फ्युचर्स मिळून सुमारे 4,618 कोटी रुपयांची खरेदी केली. तर डीआयआयनेही 5,119 कोटी रुपये गुंतवले. सलग खरेदीमुळे बाजारातील घसरणीला सध्या मजबूत आधार मिळाल्याचे चित्र आहे.
जागतिक स्तरावरही वातावरण अनुकूल आहे. अमेरिकन बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह बंद झाले. Dow Jones मध्ये सुमारे 300 अंकांची वाढ झाली, तर Nasdaq जवळपास 300 अंकांनी वाढत दोन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. मात्र आजचे सुरुवातीचे संकेत थोडे सावध आहेत. गिफ्ट निफ्टी 25,650 च्या आसपास सपाट दिसत आहे, तर डाओ फ्युचर्समध्ये सौम्य घसरण आहे.
जेनेव्हा येथे अमेरिका आणि इराण यांच्यात होणाऱ्या चर्चेपूर्वी कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये हालचाल दिसत नाही. ब्रेंट क्रूड सुमारे 71 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यवहार करत आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी संबंधित 30 व्यक्ती आणि कंपन्यांवर नव्या निर्बंध घालण्याची घोषणा केल्याने जागतिक बाजार सावध झाले आहेत.
कमोडिटी बाजारात मौल्यवान धातूंमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. चांदी तब्बल 7,600 रुपयांनी वाढून 2,68,300 रुपयांवर बंद झाली. सोनेही सुमारे 1,200 रुपयांनी वाढून 1,61,100 रुपयांच्या पुढे गेले. आंतरराष्ट्रीय बाजारातही कॉमेक्स गोल्डमध्ये वाढ झाली, तर चांदीत जवळपास 1 टक्क्यांची तेजी दिसली. बेस मेटल्समध्ये झिंक वगळता इतर सर्व धातूंमध्ये तेजी होती; अॅल्युमिनियम आणि लीडमध्ये सुमारे 2 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
आज रिटेल गुंतवणूकदारांसाठी Indian Railway Finance Corporation (IRFC) चा ऑफर फॉर सेल (OFS) खुला होत आहे. नॉन-रिटेल श्रेणीत इश्यू जवळपास 95 टक्के भरल्यानंतर सरकारने केवळ 2 टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे.
एकूणच, जागतिक संकेत, संस्थात्मक खरेदी आणि कमोडिटीतील हालचाली यांच्या एकत्रित परिणामामुळे बाजार सध्या तेजीत दिसत आहे. मात्र पुढील दिशा ठरवताना गुंतवणूकदारांची नजर जागतिक घडामोडी, मोठे व्यवहार आणि संस्थात्मक निधीच्या हालचालींवर राहणार आहे.