

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराने तेजीसह सुरुवात केली. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे 100 अंकांनी वाढला, तर निफ्टी जवळपास 40 अंकांनी वाढताना दिसत होता. मात्र, सुरुवातीच्या तेजी नंतर बाजार थोडा वरून खाली आला आणि मर्यादित चढ-उतार पाहायला मिळाले.
आजच्या व्यवहारात मेटल सेक्टरमध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली. विशेषतः हिंदुस्तान कॉपरचा शेअर सुरुवातीला तब्बल 14 टक्क्यांपर्यंत वाढला, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष या शेअरकडे गेले. निफ्टी 50 मध्ये टाटा स्टील, हिंदाल्को, बीईएल, कोटक बँक यांसारखे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते.
जागतिक बाजारांकडून मिश्र संकेत मिळत आहेत. गिफ्ट निफ्टी सुमारे 40 अंकांनी वाढून व्यवहार करत होता, त्यामुळे भारतीय बाजारासाठी हे सकारात्मक संकेत होते. मात्र अमेरिकन बाजारात मागील काही दिवसांच्या तेजीला थोडा ब्रेक लागलेला दिसतो, त्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सलग चौथ्या दिवशी थोडी विक्री केली. मात्र देशांतर्गत गुंतवणूकदारांचा बाजारावरील विश्वास कायम असून, त्यांनी सलग 84व्या दिवशी खरेदी सुरूच ठेवली आहे. यामुळे बाजाराला आधार मिळताना दिसतो.
कमोडिटी बाजारात मोठी हालचाल दिसून आली. चांदीने प्रति किलो 2.42 लाख रुपयांचा नवा उच्चांक गाठला, तर सोन्यानेही प्रति 10 ग्रॅम 1.40 लाख रुपयांचा नवा विक्रम केला. जागतिक अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढल्यामुळे या किमती वाढल्याचे तज्ज्ञ सांगतात.
पाच दिवसांच्या वाढीनंतर कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. तेलाचे दर सुमारे 61 डॉलर प्रति बॅरलखाली आले असून, यामुळे भारताला थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आज संरक्षण क्षेत्राची महत्त्वाची बैठक होणार असून, मोठ्या खरेदी प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर, बाजाराची सुरुवात सकारात्मक असली तरी जागतिक घडामोडी, कमोडिटी बाजार आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांची भूमिका यावर पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.