Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी खाली, निफ्टी 25,400 च्या जवळ
Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात झाली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) पुन्हा प्रॉफिट बुकिंग केल्याने बाजार घसरला. सुरुवातीला सौम्य घसरण असली तरी नंतर विक्रीचा दबाव वाढताना दिसला.
सकाळी सुमारे 9.21 वाजता सेन्सेक्स 274 अंकांनी घसरून 81,974 वर व्यवहार करत होता, तर निफ्टी 93 अंकांनी खाली येत 25,400 च्या आसपास होता. बँक निफ्टीतही सुमारे 196 अंकांची घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही लाल रंगात होते. मात्र आयटी क्षेत्रात 1.5 टक्क्यांची तेजी दिसून आली.
कोणते शेअर्स घसरले, कोणते वाढले?
निफ्टीतील 50 पैकी केवळ 10 शेअर्स हिरव्या रंगात होते. इन्फोसिस सुमारे 2.2 टक्क्यांनी वाढून आघाडीवर होता. टेक महिंद्रा, एचसीएल टेक, विप्रो, टीसीएस यांसारख्या आयटी शेअर्समध्येही वाढ दिसली. दुसरीकडे भारती एअरटेल, इंडिगो, कोल इंडिया, रिलायन्स, एचयूएल, मारुती, एम अँड एम आणि नेस्ले हे शेअर्स घसरले.
FIIची विक्री सुरुच, DIIची खरेदी
एका दिवसाच्या खरेदीनंतर परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा विक्री सुरू केली. FIIs ने कॅश मार्केटमध्ये सुमारे 3,466 कोटी रुपयांची विक्री केली. याउलट देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) सलग तिसऱ्या दिवशी खरेदी करत सुमारे 5,032 कोटी रुपये बाजारात गुंतवले. त्यामुळे बाजारातील घसरण मर्यादित राहण्यास मदत झाली.
जागतिक संकेत कमकुवत
अमेरिकन बाजारांमध्ये तेजी दिसली, पण शेवटी टेक शेअर्सवरील दबावामुळे निर्देशांक घसरले. डाओ जोन्स दिवसाच्या उच्चांकावरून जवळपास 300 अंकांनी खाली आला आणि किरकोळ वाढीसह बंद झाला. नॅस्डॅकमध्ये मात्र सुमारे 275 अंकांची घसरण झाली.
आजचे संकेतही कमकुवत आहेत. GIFT निफ्टी सुमारे 100 अंकांनी खाली 25,550 च्या आसपास होता, तर डाओ फ्युचर्समध्ये सुमारे 300 अंकांची घसरण दिसत होती.
कमोडिटी बाजारात दबाव
सोन्या-चांदीत मोठी प्रॉफिट बुकिंग झाली. चांदी सुमारे 8,600 रुपयांनी घसरून 2.59 लाख रुपयांच्या खाली बंद झाली. सोनेही सुमारे 1,400 रुपयांनी खाली येत 1.59 लाखांच्या आसपास आले. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीवर दबाव होता. बेस मेटल्समध्येही विक्री दिसून आली. एलएमईवर अॅल्युमिनियम सुमारे 1 टक्क्यांनी, तर निकेल जवळपास 2 टक्क्यांनी घसरला. याचा परिणाम मेटल शेअर्सवर होण्याची शक्यता आहे.
क्रूड ऑइलमध्ये चढ-उतार
कच्च्या तेलात दिवसभर चढ-उतार झाले. सुमारे 3 डॉलरच्या हालचालीनंतर क्रूड 71 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास स्थिरावले. अमेरिका-इराण चर्चेकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. 2 मार्चला दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चा होणार असल्याने तेल बाजारात अनिश्चितता कायम आहे.

