

Stock Market Opening Updates
तीन दिवसांच्या विक्रीनंतर विदेशी गुंतवणूकदार खरेदीकडे वळले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी (दि. ५ जून) सलग दुसऱ्या दिवशी तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४०० अंकांनी वाढून ८१,४२० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक १०० हून अधिक अंकांनी वाढून २४,७०० वर खुला झाला.
सेन्सेक्सवर इर्टनलचा शेअर्स ३ टक्के वाढून २५३ रुपयांवर पोहोचला आहे. त्यासोबत पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, रिलायन्स, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, एनटीपीसी हे शेअर्सही तेजीत खुले झाले आहेत. तर दुसरीकडे बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स घसरले आहेत.
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही हिरव्या रंगात खुले झाले आहेत. मिडकॅप ०.२ टक्के आणि स्मॉलकॅप ०.५ टक्के वाढला आहे. दुसरीकडे निफ्टी फार्मा निर्देशांक १ टक्के वाढला आहे. निफ्टी फार्मावरील टॉप गेनर्स शेअर्समध्ये डॉ. रेड्डीज, ग्लेनमार्क, झायडस लाईफ, लॉरस लॅब्स, लुपिन यांचा समावेश आहे.
निफ्टी आईल अँड गॅस, ऑटो हे निर्देशांकही वाढले आहेत.
अमेरिकेतील शेअर बाजारातील परिस्थिती बुधवारी संमिश्र राहिली. आशियाई बाजारातील निर्देशांकही वधारले आहेत. हाँगकाँग आणि दक्षिण कोरियातील निर्देशांकांनी ११ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे.
जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) पुन्हा रेपो दरात २५ बेसिस पॉइंटची कपात होणार असल्याच्या शक्यतेने भारतीय शेअर बाजार बुधवारी (दि.४ जून) तीन दिवसांच्या घसरणीतून सावरला होता. सेन्सेक्स २६० अंकांनी वाढून ८०,९९८ वर बंद झाला होता. तर निफ्टी ५० निर्देशांक ७७ अंकांनी वाढून २४,६२० वर स्थिरावला होता.