

Stock Market Opening Updates
भारतीय शेअर बाजाराची शुक्रवारी (दि.३०) सुस्त सुरुवात झाली. सेन्सेक्स- निफ्टी सपाट पातळीवर खुले झाले आहेत. सेन्सेक्स ५४ अंकांनी वाढून ८१,६५० वर तर निफ्टी ५० निर्देशांक २७ अंकांच्या किरकोळ वाढीसह २४,८५० जवळ व्यवहार करत आहे.
मुख्यतः आयटी शेअर्सवर दबाव राहिला आहे. गुरुवारच्या सत्रात आयटी शेअर्समध्ये खरेदी झाली होती. आज शुक्रवारी या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग दिसून येत आहे. निफ्टी आयटी निर्देशांक ०.९ टक्के घसरला आहे. निफ्टी आयटीवर टेक महिंद्रा, कोफोर्ज हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले आहेत. एचसीएल टेक, टीसीएस हे शेअर्सही घसरले आहेत.
सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्स, नेस्ले, एलटी, सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह, मारुती हे शेअर्स हिरव्या रंगात खुले झाले आहेत. तर दुसरीकडे इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले आहेत.
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावरुन गोंधळ वाढला आहे. परिणामी, आज जागतिक बाजारात संमिश्र संकेत मिळत आहेत. आशियाई बाजारातील निर्देशांक घसरले आहेत. गुरुवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज निर्देशांक घसरणीतून सावरून १०० हून अधिक अंकांनी वाढून बंद झाला. तर नॅस्डॅक ७४ अंकांच्या वाढीसह स्थिरावला.