

Stock Market Closing Updates
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावित लिबरेशन डे टॅरिफला फेडरल कोर्टाने स्थगिती दिल्याच्या निर्णयाचे भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी (दि. २९ मे) जोरदार स्वागत केले. यामुळे गेल्या दोन सत्रांतील घसरणीनंतर बाजारात तेजी परतली. फायनान्सियल आणि आयटी शेअर्समधील वाढीच्या जोरावर सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत बंद झाले. सेन्सेक्स ३२० अंकांनी वाढून ८१,६३३ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ८१ अंकांच्या वाढीसह २४,८३३ वर स्थिरावला.
अमेरिकेच्या एका फेडरल न्यायालयाने बुधवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रस्तावित 'लिबरेशन डे' टॅरिफला स्थगिती दिली. 'लिबरेशन डे' टॅरिफचा आदेश बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले. या निर्णयामुळे व्यापार तणाव कमी होईल, या आशेने गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या. विशेषतः आयटी शेअर्समध्ये आज तेजी राहिली. निफ्टी आयटी ०.७ टक्के वाढला. आयटी कंपनी कोफोर्जचा शेअर्स २.७ टक्के वाढून टॉप गेनर ठरला.
बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल २९ मे रोजी १.८२ लाख कोटींनी वाढून ४४५.५९ लाख कोटींवर पोहोचले. २८ मे रोजी ते ४४३.७७ लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.८२ लाख कोटींची वाढ झाली.
सेक्टरमध्ये निफ्टी मेटल निर्देशांकाने आघाडी घेतली. हा निर्देशांक १.२ टक्के वाढून बंद झाला. वेलस्पन कॉर्प ९.७ टक्के वाढला. जेएसएल, जिंदाल स्टील हे शेअर्सही वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप प्रत्येकी ०.४ टक्के वाढून बंद झाले.
सेन्सेक्सवरील ३० पैकी २४ शेअर्स आज हिरव्या रंगात बंद झाले. यावर इंडसइंड बँक, सन फार्मा, अदानी पोर्ट्स, इर्टनल, टाटा स्टील, टेक महिंद्रा हे शेअर्स १ ते २.५ टक्क्यांपर्यंत वाढले. तर दुसरीकडे बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, एशियन पेंट्स हे शेअर्स घसरले.