

Stock Market Closing Updates
अमेरिका आणि प्रमुख भागीदारी देश भारत, चीन यांच्यामधील द्विपक्षीय व्यापार चर्चा पुढे जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.११ जून) आशियासह भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स १२३ अंकांनी वाढून ८२,५१५ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ३७ अंकांच्या किरकोळ वाढीसह २५,१४१ वर स्थिरावला.
शेअर बाजारात प्रॉफिट बुकिंग झाल्याने तेजी मर्यादित राहिली. आयटी, ऑईल आणि गॅस शेअर्समध्ये मजबूत वाढ दिसून आली. तर एफएमसीजी (FMCG) आणि पीएसयू बँक (PSU banks) शेअर्समधील घसरणीमुळे बाजारातील भावना कमकुवत झाल्या. निफ्टी ऑईल अँड गॅस निर्देशांक १.५ टक्के वाढला. निफ्टी आयटी १.२ टक्के वाढून बंद झाला. एनर्जी आणि इन्फ्रास्ट्रक्चर शेअर्सही तेजीत राहिले.
दरम्यान, फायनान्सियल शेअर्समधील विक्रीमुळे व्यापक बाजारपेठेत वाढ मर्यादित दिसून आली. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस आणि निफ्टी बँक निर्देशांक दोन्ही प्रत्येकी ०.३ टक्के घसरले.
सेन्सेक्सवरील ३० पैकी १८ शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले. तर १२ शेअर्स घसरले. एचसीएल टेकचा शेअर्स ३.२ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. इन्फोसिसचा शेअर्स २ टक्के वाढला. टेक महिंद्रा, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, इटर्नल हे शेअर्सही वधारले. तर पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक हे शेअर्स घसरले.
महाराष्ट्र सरकारने भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्क वाढवल्यानंतर मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरवर आज दबाव राहिला. रेडिको खेतानचा शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक घसरला. तर युनायटेड स्पिरिट्सचा शेअर्स ६.६ टक्क्याने खाली आला.