

Silver Price Crash: चांदीच्या किंमतींमध्ये गेल्या काही महिन्यांत प्रचंड चढ-उतार झाले आहेत. एकेकाळी गुंतवणूकदारांसाठी सोन्यापेक्षाही अधिक आकर्षक ठरलेली चांदी आता मोठ्या घसरणीमुळे चर्चेत आली आहे. जानेवारी २०२६ मध्ये विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर चांदीच्या दरात तब्बल २ लाख रुपयांची घसरण झाली असून, यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. आता प्रश्न असा आहे की, सध्या झालेल्या घसरणीत चांदी खरेदी करणे योग्य आहे का?
२०२५ मध्ये चांदीने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला होता. त्या वर्षात चांदीच्या किंमतींमध्ये जवळपास १७० टक्क्यांची वाढ झाली होती. त्यानंतर जानेवारी २०२६ मध्येही दरांमध्ये आणखी ७४ टक्क्यांची वाढ झाली आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीचा दर प्रतिकिलो ४.३९ लाख रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता.
मात्र त्यानंतर चित्र पूर्णपणे बदललं. अवघ्या तीन महिन्यांत चांदीच्या दरात तब्बल ४६ टक्क्यांची घसरण झाली आणि किंमत २.४० लाख रुपयांच्या खाली आली. म्हणजेच उच्चांकापासून पाहिल्यास चांदी प्रतिकिलो सुमारे २ लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे.
या मोठ्या घसरणीमागे अनेक जागतिक कारणं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. पहिलं मोठं कारण म्हणजे पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती. सामान्यतः युद्ध किंवा भू-राजकीय संकटाच्या काळात गुंतवणूकदार सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळतात.
पण यावेळी उलट चित्र दिसलं. वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांनी जोखीम कमी करण्यासाठी विविध मालमत्तांमधून पैसे काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे चांदीवर विक्रीचा दबाव वाढला.
दुसरं कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची तेजी आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची कठोर आर्थिक भूमिका. डॉलर मजबूत झाल्याने डॉलरमध्ये ठरवल्या जाणाऱ्या चांदीसारख्या धातूंची मागणी कमी झाली.
तिसरं कारण म्हणजे मोठ्या वाढीनंतर झालेली नफावसुली. चांदीने विक्रमी तेजी अनुभवल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी नफा बुक करण्यासाठी विक्री केली. त्यामुळे दर आणखी खाली आले.
घसरणीनंतर अनेक गुंतवणूकदार आता संभ्रमात आहेत. मात्र काही तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही चांगली संधी असू शकते.
टाटा म्युच्युअल फंडच्या अहवालानुसार, चांदीच्या किंमतींमधील ही घसरण तात्पुरती असू शकते. विशेषतः औद्योगिक क्षेत्रात चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. इलेक्ट्रॉनिक्स, सोलर पॅनल्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रात चांदीची मागणी सातत्याने वाढत आहे.
जगातील एकूण चांदी वापरापैकी ६० टक्क्यांहून अधिक वापर औद्योगिक क्षेत्रात होतो. याशिवाय चीनसारख्या देशांमधून गुंतवणुकीची मागणीही कायम असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
चांदीत गेल्या पाच वर्षांपासून पुरवठ्याची कमतरता असल्याचं समोर आलं आहे. आता सहाव्या वर्षातही ही तूट कायम आहे. काही देशांतील निर्यात निर्बंध आणि घटणारे साठे यामुळे चांदीचा पुरवठा कमी केला आहे. यामुळे चांदीच्या किंमती पुन्हा वाढू शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.
तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत एकदम मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणं अधिक फायद्याचं आहे. बाजारातील अस्थिरता लक्षात घेता मध्यम आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणं फायदेशीर ठरू शकतं.
तांत्रिक विश्लेषणानुसार MCX वर चांदी सध्या २.४५ लाख रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. जर किंमत २.४६ लाख रुपयांच्या वर स्थिर राहिली, तर पुढील काळात पुन्हा तेजी दिसू शकते. मात्र बाजारातील अस्थिरता अजूनही कायम असल्याने गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.