

LPG Cylinder Rules: १ मेपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होऊ शकतो. सिलिंडर बुकिंगपासून डिलिव्हरीपर्यंत अनेक नवीन नियम लागू होण्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे बुकिंग, OTP आधारित डिलिव्हरी, अनिवार्य eKYC आणि गॅस दरवाढ याची माहिती ग्राहकांना असणे गरजेचे आहे.
नव्या नियमांनुसार एका सिलिंडरनंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी लागणारा कालावधी वाढवला जाऊ शकतो. सध्या अनेक ग्राहक गरजेनुसार लगेच बुकिंग करतात, मात्र आता शहरी भागात जवळपास २५ दिवसांचा आणि ग्रामीण भागात तब्बल ४५ दिवसांचं अंतर ठेवण्याचा नियम लागू होऊ शकतो. यामुळे ग्राहकांना घरातील गॅस वापराचं नियोजन अधिक काळजीपूर्वक करावं लागणार आहे. विशेषतः मोठ्या कुटुंबांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरू शकतो.
नव्या नियमांनुसार गॅस सिलिंडर डिलिव्हरीसाठी OTP प्रणाली अधिक कठोर केली जाणार आहे. सिलिंडर घरपोच आणणाऱ्या डिलिव्हरी एजंटला ग्राहकाने मोबाईलवर आलेला OTP सांगितल्याशिवाय सिलिंडर दिला जाणार नाही. या निर्णयामागचा उद्देश फसवणूक रोखणे आणि सिलिंडर योग्य ग्राहकापर्यंत पोहोचतोय याची खात्री करणे हा आहे.
सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांसाठी आधार आधारित eKYC अनिवार्य होण्याची शक्यता आहे. जर ग्राहकांनी वेळेत eKYC पूर्ण केली नाही, तर गॅस सबसिडी किंवा पुरवठा बंद होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या गॅस एजन्सीकडे किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन eKYC अपडेट करून घेणं आवश्यक आहे.
एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही पुन्हा वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलीकडेच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे ६० रुपयांची वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि पुरवठ्यावरील दबावामुळे पुढील काळात आणखी दरवाढ होऊ शकते. यामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.
सरकारकडून पाइपद्वारे पुरवठा होणाऱ्या PNG गॅसचा वापर वाढवण्यावरही भर दिला जात आहे. ज्या भागांमध्ये PNG सुविधा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी ग्राहकांना हळूहळू PNG वापरण्यास प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं. काही ठिकाणी भविष्यात PNG उपलब्ध असूनही ग्राहकांनी त्याचा वापर केला नाही, तर एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नियम बदलले तरी सिलिंडर बुकिंगची प्रक्रिया पूर्वीसारखीच राहणार आहे. ग्राहक WhatsApp, SMS, मिस्ड कॉल, IVRS, अधिकृत मोबाइल अॅप किंवा वेबसाइटद्वारे सिलिंडर बुक करू शकतात. मात्र बुकिंग करताना नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरणं अत्यावश्यक असेल. अधिकृत माध्यमांचाच वापर करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
१ मेपासून हे बदल प्रत्यक्षात लागू झाले, तर लाखो ग्राहकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी वेळेत आवश्यक कागदपत्रं अपडेट ठेवून आणि नव्या नियमांची माहिती घेऊन तयार राहणं गरजेचं आहे.