

US tariff Concerns Sensex Falls: भारतीय शेअर बाजारात आजच्या (दि. ९ जानेवारी) दिवसाची सकाळ ही पॉझिटिव्ह झाली होती. मार्केट थोडं हिरव्या रंगात ओपन झालं. मात्र हे वाढलेलं शेअर मार्केट फारकाळ टिकलं नाही. हळूहळू शेअर मार्केट लाल रंगात जाऊ लागलं. दुपारी १२.४० मिनिटांपर्यंत सेन्सेक्स जवळपास ६२३.७८ पॉईंट्सनी खाली आला. तर निफ्टी देखील २५ हजार ७०० पॉईंट्सच्याही खाली आलं. सेन्सेक्स ०.७४ टक्क्यांनी घसरून 83,557.18 पर्यंत खाली आली. तर निप्टी देखील ०.७४ टकक्यांनी खाली आले.
शेअर मार्केटमध्ये झालेली ही मोठी घसरण ही मुख्यत्वे जागतिक व्यापारासंदर्भात निर्माण झालेल्या अनिश्चित वातावरणामुळे झाली असल्याचं जाणकारांचे मत आहे. मात्र याला अजूनही काही कारणे आहेत.
विदेशी गुंतवणूकदारांनी गुरूवारी मार्केटमधील जवळपास ३ हजार ३६७. १२ कोटी रूपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. २ जानेवारीनंतर सलग चौथ्या दिवशी परदेशी गुंतवणूक दारांमध्ये विक्रीचा ट्रेंड सुरूच राहिला आहे.
भारतीय शेअर मार्केटमधील गुंतवणूकदार हे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफ निर्णयाबाबत युएस सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो याकडे लक्ष ठेवून आहेत. सध्याच्या घडीला याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे त्याचा परिणाम मार्केटवर देखील दिसत आहे. जर न्यायालयाने ट्रम्प यांचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे सांगितलं तर अमेरिकेच्या सरकारला आयातदारांना जवळपास १५० बिलियन अमेरिकन डॉलरचा रिफंड द्यावा लागणार आहे.
त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं नव्या विधेयकाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने भारतावर ५०० टक्के टॅरिफ लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांचे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा काय निर्णय येतो याकडे जास्तच लक्ष लागून राहिले आहे.
भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होण्याचं कारण म्हणजे रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिका तब्बल ५०० टक्के टॅरिफ लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ट्रम्प रशियाच्या तेल खरेदीदारांवर नव्याने टॅरिफ लावण्याची तयारी करत आहेत. त्याचा देखील परिणाम भारतीय शेअर मार्केटवर झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अनुक्रमे १.८ आणि १.७ टक्क्यांची घसरण झाली आहे.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती ०.५३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. आता प्रती बॅरल ६२.३२ डॉलर मोजावे लागत आहेत. तेलाच्या किंमती वाढल्या की भारताचा तेल आयातीचा खर्च देखील वाढतो. त्यामुळं महागाईची भीती निर्माण होते. त्याचा परिणाम देखील शेअर मार्केटवर होतो.
नुकतेच रूपयाची डॉलरच्या तुलनेतील किंमत ही ७ पैशांनी कमी झाली आहे. सध्या रूपयाची किंमत ही ८९.९७ डॉलर इतकी झाली आहे. आज मार्केट सुरू झालं त्यावेळी इंटर बँक फॉरेन एक्सचेंजमध्ये रूपयाची किंमत ८८.८८ डॉलर इतकी होती. ती पुढे घसरली. त्याचा परिणाम देखील शेअर मार्केटवर झाला आहे.
त्याचबरोबर फॉरेक्स ट्रेडर्स यांनी सांगितलं की युएस नव्याने टॅरिफ वाढवण्याची शक्यता आणि कमजोर डोमेस्टिक इक्विटी मार्केट यामुळं परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीकडेच कल दिसत आहे. त्यामुळे रूपयावर अजूनच दबाव निर्माण होत आहे.