

नाशिक: शहरात दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये दिड कोटी रकमेची ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शेअर मार्केट ट्रेडिंगच्या बहाण्याने जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ८० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व साक्षीदार यांना विविध व्हॉट्सॲप , टेलिग्रामवरून अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शेअर मार्केट ब्रोकर असल्याचे भासविले. त्यानुसार ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंगच्या बहाण्याने जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. तसेच फिर्यादी व साक्षीदार यांनी फसवणूक करून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ८० लाख १० हजार रुपये मोबाईल फोन व इंटरनेटद्वारे ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. त्यांचे पैसे परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार २७ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत फिर्यादीच्या राहत्या घरी घडला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ऑनलाईन मार्केटिंगमधून ६० लाखांचा गंडा
ऑनलाईन ज्वेलरी मार्केटिंगमध्ये अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवून दोन जणांची ६० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे ३९ वर्षीय असून, ते नाशिक येथे राहतात. फिर्यादी यांच्याशी एका व्हॉट्सॲप क्रमांकावरून एका अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला. शेअर मार्केट ट्रेडिंग करून अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार फिर्यादी यांना ५३ लाख ६८ हजार रुपये बँक खात्यात भरणा करण्यास सांगितले, तसेच साक्षीदार नारायण गोपाळराव आगरकर यांना टेलिग्राम ॲपवर टेलिग्राम आयडीवरून एक लिंक पाठविली. त्या लिंकद्वारे ऑनलाईन ज्वेलरी मार्केटिंगद्वारे अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवून त्यांनाही ६ लाख ३१ हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. अशा पद्धतीने अज्ञात भामट्याने फिर्यादी व साक्षीदाराची एकूण ५९ लाख ९९ हजार रुपयांची रक्कम ऑनलाईनच्या माध्यमातून बँकेत भरणा करण्यास सांगून आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार डिसेंबर २०२४ ते २१ सप्टेंबर २०२५ यादरम्यान घडला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे हे करत आहेत.