Salary Hike 2027: मुंबई नाही तर... 'या' शहरांमध्ये मिळू शकतो सर्वाधिक पगार; अहवालातून मोठा खुलासा

Salary Hike Cities India 2027: आर्थिक वर्ष 2027 मध्ये पगारवाढीच्या बाबतीत चेन्नई देशात अव्वल ठरण्याची शक्यता असून सरासरी 9.7 टक्के वाढ अपेक्षित आहे.
Salary Hike Cities India 2027
Salary Hike Cities India 2027Pudhari
Published on
Updated on

Salary Hike Cities India 2027: नोकरी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पगारवाढीच्या बाबतीत आतापर्यंत बेंगळुरू, मुंबई आणि दिल्ली-एनसीआर यांसारख्या मोठ्या शहरांचे वर्चस्व राहिले होते. मात्र आगामी आर्थिक वर्ष 2027 मध्ये हे चित्र बदलताना दिसत आहे. नव्या अहवालानुसार, पगारवाढीच्या शर्यतीत चेन्नई देशातील इतर प्रमुख शहरांना मागे टाकू शकते.

रोजगार आणि वेतनवाढीचा अभ्यास करणाऱ्या टीमलीजच्या ताज्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2027 मध्ये चेन्नईतील कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 9.7 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ मुंबई, बेंगळुरू आणि इतर अनेक मोठ्या आयटी केंद्रांपेक्षा जास्त असणार आहे.

पुणे आणि हैदराबादही स्पर्धेत

चेन्नईनंतर पुणे आणि हैदराबाद ही शहरे पगारवाढीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही शहरांमध्ये सरासरी 9.6 टक्के वेतनवाढ अपेक्षित आहे.

त्याचबरोबर अहमदाबाद आणि विशाखापट्टणममध्ये 9.5 टक्के, तर नागपुरात 9.4 टक्के पगारवाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे भारतातील आर्थिक विकास आणि रोजगाराच्या संधी केवळ काही मोजक्या महानगरांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत, हे यावरुन स्पष्ट होत आहे.

1,268 कंपन्यांच्या माहितीवर आधारित अहवाल

हा अहवाल देशातील 23 उद्योग क्षेत्रे आणि 20 शहरांमधील 1,268 कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2027 मध्ये देशातील कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 8.6 टक्क्यांपासून 10.2 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. मात्र ही वाढ सर्व शहरांमध्ये सारखी नसेल. काही शहरांमध्ये उद्योग गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीमुळे वेतनवाढीचा वेग अधिक असेल.

चेन्नईत मोठी पगारवाढ का होणार?

गेल्या काही वर्षांत चेन्नई हे केवळ आयटी केंद्र न राहता ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादनाचे मोठे केंद्र म्हणून उदयास आले आहे.

या क्षेत्रांमध्ये होत असलेली मोठी गुंतवणूक, नवीन प्रकल्प आणि कुशल मनुष्यबळाची वाढती गरज यामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. त्याचाच थेट परिणाम वेतनवाढीवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

नागपूर आणि विशाखापट्टणमकडेही लक्ष

पूर्वी रोजगारासाठी मुंबई, पुणे किंवा बेंगळुरूकडे पाहिले जात होते. मात्र आता नागपूर, विशाखापट्टणम आणि अहमदाबाद यांसारखी शहरेही उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे वेगाने पुढे येत आहेत.

नवीन औद्योगिक प्रकल्प, लॉजिस्टिक्स हब, उत्पादन उद्योग आणि पायाभूत विकासामुळे या शहरांमध्ये रोजगाराच्या संधी वाढत आहेत. त्यामुळे येथील वेतनातही लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.

Salary Hike Cities India 2027
Petrol- Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे भाव पुन्हा वाढणार? सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार; दर वाढण्याचे कारण काय?

कोणत्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फायदा?

अहवालानुसार, भविष्यातील तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे.

विशेषतः इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्रातील इलेक्ट्रिकल इंजिनिअर्सना सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 11.2 टक्के वाढ अपेक्षित आहे.

याशिवाय क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टरच्या वेतनात 10.9 टक्के, प्रोजेक्ट इंजिनिअरच्या वेतनात 10.7 टक्के आणि आयटी सपोर्ट एक्झिक्युटिव्हच्या वेतनात 10.3 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.

Salary Hike Cities India 2027
Marathi Gujarati Dispute: मुंबईत नोकरीसाठी ‘फक्त गुजराती-मारवाडी’ उमेदवारांना प्राधान्य; जाहिरातीवरुन सोशल मीडियावर संताप

रोजगाराचे नवे केंद्र बदलत आहेत

हा अहवाल भारतातील बदलत्या रोजगार बाजाराचे चित्र स्पष्ट करतो. एकेकाळी केवळ आयटी क्षेत्राभोवती फिरणारी वेतनवाढ आता उत्पादन उद्योग, पायाभूत सुविधा, हेल्थकेअर आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राकडे वळत आहे.

त्यामुळे आगामी काळात नोकरी आणि करिअरच्या संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी चेन्नई, पुणे, हैदराबाद, नागपूर आणि विशाखापट्टणम यांसारखी शहरे महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news