Artificial Intelligence job market impact | एआय क्रांती : नोकऱ्यांचा शत्रू नव्हे, 'सामान्य बुद्धिमत्ते'चा अंत

तंत्रज्ञान कधीही केवळ नोकऱ्या नष्ट करत नाही, तर मूल्य कुठे निर्माण होते याचे केंद्र बदलते; असे इतिहास आपल्याला सांगतो...
Artificial Intelligence job market impact | एआय क्रांती : नोकऱ्यांचा शत्रू नव्हे, 'सामान्य बुद्धिमत्ते'चा अंत
Published on
Updated on

विजय नाईक

ज्याच्याकडे माहिती, त्याच्याकडे ताकद' या सूत्रावर आजवर जगाचे अर्थकारण चालले. पारंपरिक पाठांतर, पदव्या आणि सरासरी बुद्धिमत्तेच्या बळावर सुरक्षित मानल्या गेलेल्या पांढरपेशा (White Collar) नोकऱ्यांना आता 'कृत्रिम बुद्धिमत्ते'ने (Al) थेट आव्हान दिले आहे. या नव्या युगात स्पर्धा 'मानव विरुद्ध एआय' अशी नसून 'नियमबद्ध काम' विरुद्ध 'मूळ विचारशक्त्ती' अशी आहे. आज माहितीचा महापूर आल्यामुळे ज्ञान स्वस्त झाले असले, तरी अनिश्चित परिस्थितीत अचूक निर्णय घेण्याची मानवी क्षमता मात्र अधिक मौल्यवान होणार आहे. एआय नोकऱ्या संपवणार नाही, तर तो कामाचे एकूण अर्थशास्त्र बदलणार आहे.

माहितीच्या अर्थव्यवस्थेकडून 'निर्णयांच्या अर्थव्यवस्थेकडे' जगाचा प्रवास...

मानवी इतिहासातील प्रत्येक मोठ्या तांत्रिक क्रांतीने केवळ उत्पादन पद्धती किंवा यंत्रे बदललेली नाहीत, तर तिने मानवी समाजातील सत्तेची आणि अर्थकारणाची रचना मुळापासून बदलून टाकली आहे. अठराव्या शतकातील वाफेच्या इंजिनाने उत्पादनाच्या पारंपरिक व्याख्या बदलल्या, विजेच्या शोधामुळे उद्योगांना अभूतपूर्व वेग मिळाला, तर विसाव्या शतकाच्या शेवटी आलेल्या संगणकाने कार्यालयीन व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. त्यानंतरच्या इंटरनेट क्रांतीने माहितीचे लोकशाहीकरण केले; परंतु आज आपण ज्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) उंबरठ्यावर उभे आहोत, ती क्रांती या सर्व भूतकाळातील बदलांपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि अधिक आव्हानात्मक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, इतिहासात पहिल्यांदाच एखादे तंत्रज्ञान मानवी शारीरिक श्रमांवर किंवा कौशल्यांवर नव्हे, तर थेट मानवी बौद्धिक पुनरुत्पादनावर आघात करत आहे. आजवर ज्या सरासरी ज्ञान असलेल्या पांढरपेशा नोकऱ्यांना 'सुरक्षित' मानले जात होते, त्यांच्याच अस्तित्वावर आता एआयने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Artificial Intelligence job market impact | एआय क्रांती : नोकऱ्यांचा शत्रू नव्हे, 'सामान्य बुद्धिमत्ते'चा अंत
AI overuse dangerous | ए.आय.चा अतिरेकी वापर धोकादायकच!

आजवर जगातील संपूर्ण अर्थव्यवस्था एका साध्या आणि सर्वसामान्य तत्वावर उभी होती, 'ज्यांच्याकडे माहिती, त्यांच्याकडे ताकद.' याच तत्त्वामुळे पारंपरिक शिक्षणाला समाजात मोठी किंमत होती, पदवीला प्रतिष्ठा होती आणि कार्यालयीन नोकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता लाभली होती. माहिती शोधणे, तिचे संकलन व विश्लेषण करणे, अहवाल तयार करणे आणि अंतिम निर्णयासाठी संदर्भ गोळा करणे ही सर्व 'सामान्य बुद्धिमत्ते'ची कौशल्ये बाजारात मोठे आर्थिक मूल्य निर्माण करत होती; परंतु एआयने प्रथमतः याच 'माहिती' नावाच्या घटकाला अत्यंत स्वस्त आणि सहज उपलब्ध करून दिले आहे. आता माहिती दुर्मिळ राहिलेली नाही, तर दुर्मिळ झाली आहे माहितीचा योग्य संदर्भ समजून घेण्याची क्षमता. या नव्या युगात माहितीची उपलब्धता मुबलक असल्यामुळे त्याचे आर्थिक मूल्य कमी झाले आहे; परंतु त्या माहितीच्या आधारे अचूक निर्णय घेण्याची क्षमता मात्र प्रचंड महाग आणि मौल्यवान ठरली आहे. एआय हा केवळ माहिती गोळा करण्याचा स्रोत उरलेला नाही, तर तो त्या माहितीचे वर्गीकरण मानवी हस्तक्षेपाशिवाय अतिशय वेगाने करू शकतो, ज्यामुळे पारंपरिक ज्ञानाची चौकट आणि तिची उपयुक्तता पूर्णपणे बदलून गेली आहे.

सध्याच्या घडीला एआयबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज कोणता आहे, तर तो म्हणजे 'एआय सर्व नोकऱ्या हिरावून घेईल.' इतिहासाच्या पानांवर डोकावून पाहिले, तर हे चित्र नवीन नाही. अठराव्या शतकात युरोपमध्ये जेव्हा यांत्रिक विणकर यंत्रे आली, तेव्हा हजारो कामगारांना वाटत होते की, यंत्रे त्यांचा रोजगार हिरावून घेतील; पण त्याच काळात वस्त्रोद्योगाचा विस्तार इतका मोठा झाला की, पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक रोजगार निर्माण झाले. अगदी नव्वदच्या दशकात जेव्हा बँका आणि कार्यालयांमध्ये संगणक आले, तेव्हा कार्यालयीन कामांचे भविष्य संपल्याची भीती वर्तवली जात होती. ती काही अंशी खरी ठरली असली, तरी त्याच वेळी सॉफ्टवेअर उद्योगात लाखो नवे रोजगार उपलब्ध झाले. इंटरनेट आल्यानंतर पारंपरिक व्यवसायांना मोठा फटका बसला; पण त्याच इंटरनेटने ई-कॉमर्स व ऑनलाइन शिक्षण यांसारखे नवे उद्योग जन्माला घातले. इतिहासाचा धडा स्पष्ट आहे की, तंत्रज्ञान नोकऱ्या संपवत नाही, ते नोकऱ्यांची पुनर्रचना करते.

Artificial Intelligence job market impact | एआय क्रांती : नोकऱ्यांचा शत्रू नव्हे, 'सामान्य बुद्धिमत्ते'चा अंत
Maharashtra Day‌ : ‘एआय‌’ महाराष्ट्र!

एआयचा प्रभाव सर्व क्षेत्रांवर समान नाही, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वाधिक प्रभाव संगणक आणि गणितीय क्षेत्रांवर दिसतो. प्रोग्रामिंग, डेटा विश्लेषण या क्षेत्रांमध्ये एआय नैसर्गिकरित्या अधिक प्रभावी ठरत आहे.अभियंत्रिकीमध्ये एआय नवनवीन आराखडे किंवा पर्याय सुचवत आहे. व्यवसाय आणि आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रात एआय वेगाने प्रवेश करत आहे. कार्यालयीन आणि प्रशासकीय क्षेत्रांवर मोठा परिणाम होत आहे; पण अंतिम निर्णय अजूनही मानवी अनुभव, जोखीम आणि परिस्थितीचे आकलन यांवरच अवलंबून आहे. शिक्षण क्षेत्रात एआय माहिती देत आहे किंवा वैयक्तिक मार्गदर्शन करत आहे; पण विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा, आत्मविश्वास आणि मूल्य संस्कार निर्माण करू शकत नाही. आरोग्य क्षेत्रात एआय रोग ओळखण्यात मदत करत आहे; पण रुग्णाच्या डोळ्यांतील भीती समजून घेऊन त्याला धीर देण्याचे काम डॉक्टरांनाच करावे लागेल. याउलट बांधकाम, दुरुस्ती, अन्न प्रक्रिया, वाहतूक, देखभाल आणि प्रत्यक्ष सेवा या क्षेत्रांवर एआयचा परिणाम तुलनेने खूप कमी आहे. कारण, ही कामे माहितीवर नव्हे, तर प्रत्यक्ष परिस्थिती, मानवी हालचाल, अनुभव आणि प्रतिसादावर चालतात.

येथेच एक मोठा आर्थिक विरोधाभास उभा राहिला आहे. एआय सर्वप्रथम कारखान्यातील कामगारांवर नव्हे, तर वातानुकूलित कार्यालयांतील कर्मचाऱ्यांवर परिणाम करत आहे. पूर्वी उद्योगाची ताकद मनुष्यबळात मोजली जात होती. भविष्यात उद्योगांची ताकद कमी लोकांकडून अधिक मूल्य निर्माण करण्याच्या क्षमतेत मोजली जाईल. एआय युगात माहिती देणारा स्वस्त होईल; पण अचूक प्रश्न विचारण्याची कला अधिक मौल्यवान बनेल. या सर्व आव्हानांच्या पलीकडे जाऊन पाहिले, तर या चर्चेचा एक सकारात्मक पैलूही तितकाच महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे इंटरनेटने प्रत्येक व्यवसायाचे डिजिटल रूपांतर केले, त्याचप्रमाणे एआय प्रत्येक उद्योगाचे 'बौद्धिक रूपांतर' करत आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात एआयचा वापर करून नवीन सेवा, नवीन व्यवसाय आणि नवीन रोजगार निर्माण होत आहेत.

Artificial Intelligence job market impact | एआय क्रांती : नोकऱ्यांचा शत्रू नव्हे, 'सामान्य बुद्धिमत्ते'चा अंत
Artificial Intelligence | कृत्रिम बुद्धिमत्ता : संधी की संकट?

इतिहास आपल्याला हेच सांगतो की, तंत्रज्ञान कधीही केवळ नोकऱ्या नष्ट करत नाही, तर मूल्य कुठे निर्माण होते याचे केंद्र बदलते. औद्योगिक क्रांतीने हातांची किंमत कमी करून यंत्रे चालवणाऱ्यांची किंमत वाढवली. संगणक क्रांतीने कागदावरील कामाचे मूल्य कमी करून माहिती हाताळणाऱ्यांची किंमत वाढवली. आता एआय क्रांती माहितीचे मूल्य कमी करेल; परंतु मानवी निर्णय, संदर्भ, सर्जनशीलता, जबाबदारी आणि दूरदृष्टी यांचे मूल्य प्रचंड प्रमाणात वाढवेल. म्हणूनच भविष्यातील खरी लढाई 'मानव विरुद्ध एआय' अशी नसून ती 'सामान्य बौद्धिक काम' विरुद्ध 'मूळ विचारशक्ती' अशी असेल. एआय युगात पदवीपेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरेल, माहितीपेक्षा संदर्भ महत्त्वाचा ठरेल, वेगापेक्षा दिशा महत्त्वाची ठरेल आणि ज्ञानापेक्षा निर्णय क्षमता महत्त्वाची ठरेल. कदाचित पुढील दशकाचे सर्वात अचूक आर्थिक वाक्य हेच असेल की, 'एआय युगात ज्ञान स्वस्त होईल; पण निर्णय क्षमता महाग होईल.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news