Petrol- Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे भाव पुन्हा वाढणार? सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार; दर वाढण्याचे कारण काय?

Crude Oil Prices: अमेरिका-इराण तणाव पुन्हा वाढल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.
Petrol- Diesel Price
Petrol- Diesel PricePudhari
Published on
Updated on

Crude Oil Prices: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची आशा निर्माण झाली असतानाच अमेरिकेने इराणवर नव्या लष्करी कारवाया केल्याने जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ उडाली आहे. या घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ झाली असून त्याचा परिणाम भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरही होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्ध थांबवण्यासाठी चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचा दावा करत होते. मात्र त्याचवेळी अमेरिकेने इराणमधील काही लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याचे वृत्त समोर आले. या कारवाईनंतर गुंतवणूकदार आणि ऊर्जा बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

कच्च्या तेलाच्या किंमतीत झपाट्याने वाढ

या तणावाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या बाजारावर दिसून आला. जागतिक बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेल्या ब्रेंट क्रूडच्या किंमती जवळपास 1 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 93 डॉलरपर्यंत पोहोचल्या. तर अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूडचा भाव 89 डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढला.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी इस्रायल आणि इराण यांनी एकमेकांवरील थेट हल्ले थांबवण्याचे संकेत दिल्यानंतर तेलाच्या किंमती खाली आल्या होत्या. मात्र अमेरिकेच्या नव्या कारवाईने पुन्हा एकदा बाजाराचे चित्र बदलले.

तणाव वाढण्यामागे नेमके कारण काय?

या नव्या संघर्षाची सुरुवात इराणने अमेरिकेच्या अपाचे हल्लेखोर हेलिकॉप्टरला लक्ष्य केल्यापासून झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता.

काही तासांतच अमेरिकन सैन्याने दक्षिण इराणमधील क्षेपणास्त्र तळ आणि रडार यंत्रणांवर हवाई हल्ले केले. या कारवाईमुळे दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला युद्धविराम धोक्यात आला असून परिस्थिती पुन्हा युद्धाच्या दिशेने जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीत अद्याप तणाव

जागतिक तेल पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनी अजूनही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या मार्गातून मोठी तेलवाहतूक होते.

अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे या भागातील जहाजांच्या हालचालींवर परिणाम झाला आहे. काही जहाजांना अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याने जागतिक तेलपुरवठ्यावर दबाव वाढला आहे. त्यामुळे तेलाच्या किंमती वाढण्याचा धोका कायम आहे.

अमेरिकेतील तेलसाठ्यात मोठी घट

दरम्यान, अमेरिकेतील तेलसाठ्यात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे बाजारातील चिंता आणखी वाढली आहे. अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूटच्या (API) आकडेवारीनुसार, अमेरिकेच्या कच्च्या तेलाच्या साठ्यात सलग आठव्या आठवड्यात घट झाली आहे.

अमेरिकेचा कच्च्या तेलाचा साठा तब्बल 91.2 लाख बॅरलने कमी झाला आहे. याशिवाय पेट्रोलच्या साठ्यातही 11.9 लाख बॅरलची घट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे तेलाचा पुरवठा कमी होण्याची भीती वाढली असून त्याचा परिणाम जागतिक बाजारावर होत आहे.

Petrol- Diesel Price
Petrol Price Breakdown: सरकारला एक लिटर पेट्रोल किती रुपयांना पडतं? मग पंपावर किंमत दुप्पट कशी होते? जाणून घ्या संपूर्ण गणित

भारतावर काय परिणाम होऊ शकतो?

भारत हा आपल्या गरजेपैकी बहुतांश कच्चे तेल आयात करणारा देश आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यास त्याचा परिणाम देशांतर्गत इंधन दरांवर होण्याची शक्यता असते.

सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही तातडीचा बदल झालेला नसला तरी पश्चिम आशियातील तणाव वाढत राहिला आणि कच्च्या तेलाचे दर आणखी वाढले, तर आगामी काळात इंधन महाग होण्याचा दबाव निर्माण होऊ शकतो.

Petrol- Diesel Price
PM Kisan 23rd Installment: PM किसानचा 23 वा हप्ता कधी येणार? 30 जूनपूर्वी हे काम न केल्यास अडकू शकतात 2,000 रुपये

एकूणच, अमेरिका-इराण संघर्ष, होर्मुझ सामुद्रधुनीतील अनिश्चितता आणि अमेरिकेतील घटता तेलसाठा या तिन्ही घटकांमुळे जागतिक तेलबाजार पुन्हा अस्थिर झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किंमती आणि त्याचा पेट्रोल-डिझेलच्या दरांवर होणारा परिणाम याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news