

RCB Ownership Update: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) म्हणजेच विराट कोहलीची लोकप्रिय आयपीएल टीम लवकरच नव्या मालकाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. सध्याचे मालक ब्रिटनस्थित डियाजियो ग्रुप यांनी RCB विक्रीसाठी सज्ज असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला (BSE) पाठवलेल्या अधिकृत पत्रात सांगितले की, "RCB च्या विक्रीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे."
क्रिकबझच्या माहितीनुसार, डियाजियोच्या भारतीय शाखा युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडने (USL) आपली पूर्ण मालकीची उपकंपनी रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (RCSPL) च्या गुंतवणुकीचा पुनर्विचार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कंपनीच्या अंतर्गत RCB च्या पुरुष आणि महिला (WPL) संघांचा समावेश आहे. डियाजियोने सांगितले आहे की ही प्रक्रिया 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण होईल.
USL चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO प्रवीण सोमेश्वर यांनी सांगितले की, "RCB आमच्यासाठी एक मूल्यवान आणि प्रतिष्ठित मालमत्ता आहे, पण ती आमच्या मुख्य अल्कोहोल व्यवसायासाठी आवश्यक नाही."
RCB च्या पुरुष आयपीएल टीमसह महिला प्रीमियर लीग (WPL) टीमचाही समावेश या विक्री प्रक्रियेत केला जाणार आहे. डियाजियोच्या या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमी आणि व्यावसायिक वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. विराट कोहली, फाफ डु प्लेसिस आणि स्मृती मंधाना यांच्या नेतृत्वाखालील टीमसाठी आता नवा मालक कोण असेल, हे पाहणे सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय आहे.