

FMCG Entry Level Products: गेल्या सहा-सात वर्षांपासून FMCG क्षेत्रात “प्रीमियमायझेशन” म्हणजेच महागड्या आणि उच्च दर्जाच्या उत्पादनांवर भर दिला जात होता. पण आता चित्र बदलू लागलं आहे. ग्रामीण भागातून हळूहळू मागणी वाढू लागल्याचे संकेत मिळताच अनेक FMCG आणि कंझ्युमर कंपन्या पुन्हा एकदा स्वस्त उत्पादनांकडे वळताना दिसत आहेत.
कंपनी प्रमुखांच्या मते, डिसेंबरपासून ग्रामीण बाजारात आणि कमी उत्पन्न गटात खरेदी वाढत असल्याची चिन्हं दिसत आहेत. GST दर कपातीमुळे दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त झाल्या असून, याचा थेट फायदा कमी उत्पन्न गटातील ग्राहकांना होत आहे. याच पार्श्वभूमीवर कंपन्या छोट्या पॅकिंग्स आणि कमी किमतीच्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करत आहेत.
इमामीचे उपाध्यक्ष मोहन गोएंका यांनी अलीकडे बोलताना सांगितलं की, पुढील वर्षी कंपनीचा मुख्य भर शॅम्पू सॅशे आणि इतर छोट्या SKU (स्टॉक कीपिंग युनिट्स) वर असेल. पुरुषांसाठीच्या ग्रूमिंग उत्पादनांतही आता लहान पॅकवर अधिक लक्ष दिलं जाईल, कारण ग्रामीण बाजारात चांगली वाढ होताना दिसत आहे.
“आता खरी वाढ ग्रामीण भागात होईल. आतापर्यंत आम्ही मॉडर्न ट्रेड आणि ई-कॉमर्सवर जास्त लक्ष दिलं होतं. पुढच्या काही तिमाहींमध्ये ग्रामीण बाजार हा आमचा मुख्य फोकस असेल,” असं गोएंका म्हणाले.
त्यांच्या मते, छोट्या पॅकमुळे पहिल्यांदा खरेदी करणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचणं सोपं होतं आणि त्यातून व्हॉल्यूम ग्रोथ होते.
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातही हाच ट्रेंड दिसतोय. LG Electronics India ने पहिल्यांदा खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खास नवीन प्रॉडक्ट रेंज सादर केली आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर कंपनी पुन्हा फिक्स्ड-स्पीड एअर कंडिशनर सेगमेंटमध्ये उतरत असून, ही उत्पादने पूर्णपणे एंट्री-लेव्हल ग्राहकांसाठी तयार करण्यात आली आहेत.
LG इंडियाचे मार्केटिंग प्रमुख संजय चितकारा यांच्या मते, या नव्या उत्पादनांमुळे कंपनीचा उद्देश व्हॉल्यूम वाढवण्याचा असून, नव्या ग्राहकांना LG च्या इकोसिस्टममध्ये आणण्यावर भर दिला जाणार आहे.
कोल्ड ड्रिंक क्षेत्रात Varun Beveragesने (PepsiCo ची बॉटलिंग पार्टनर) जानेवारीत ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालसारख्या काही बाजारांत 10 रुपयांचा पॅक लॉन्च केला आहे. कंपनीचे प्रवर्तक आणि कार्यकारी उपाध्यक्ष वरुण जैपूरिया यांच्या मते, जिथे गरज वाटेल तिथे हे पॅक आणले जातील.
Dabur नेही आपल्या ड्रिंक पोर्टफोलिओमध्ये ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 असे वेगवेगळ्या किमतींचे छोटे पॅक बाजारात आणले आहेत.
दरम्यान, Hindustan Unilever ने Surf Excel डिटर्जंटचा ₹99 चा पॅक लॉन्च केला आहे. कंपनीच्या CEO प्रिया नायर यांच्या मते, यामुळे अधिकाधिक नवीन ग्राहक प्रीमियम सेगमेंटमध्ये येतील आणि कंपनीच्या विस्ताराला मदत होईल. तसेच Colgate-Palmolive India ने आपल्या प्रीमियम दात पांढरे करणाऱ्या उत्पादनांसाठी छोटा पॅक बाजारात आणला आहे.
गेल्या काही तिमाहींमध्ये FMCG आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला मोठ्या मंदीचा सामना करावा लागला होता. आधी कोविड, त्यानंतर महागाईमुळे दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग झाल्या आणि खरेदीवर परिणाम झाला. त्यामुळे कंपन्यांनी एंट्री-लेव्हल उत्पादने कमी केली.
मात्र आता परिस्थिती हळूहळू बदलत आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या GST कपातीमुळे साबण, दुग्धजन्य पदार्थांसारख्या दैनंदिन वस्तूंपासून ते एअर कंडिशनर, मोठ्या स्क्रीनचे टीव्ही आणि कार्सपर्यंत अनेक वस्तू स्वस्त झाल्या. त्याचबरोबर आर्थिक निर्देशांक सुधारत असल्याने उपभोग वाढताना दिसत आहे, असं कंपन्यांचं म्हणणं आहे.
उद्योगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, पुढील काही तिमाहींमध्ये ग्रामीण आणि शहरी दोन्ही बाजारांत विक्री वाढण्याची शक्यता आहे. प्रीमियम उत्पादनांची मागणी पूर्णपणे कमी झाली नसली, तरी सध्या कंपन्यांचा भर मोठ्या प्रमाणात स्वस्त पॅक आणि पहिल्यांदा खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर आहे. थोडक्यात, अनेक वर्षांच्या “प्रीमियमायझेशन” नंतर आता FMCG आणि कंझ्युमर कंपन्या पुन्हा ग्रामीण बाजाराकडे वळताना दिसत आहेत.