

Copper Price Boom: 2025 मध्ये सोनं आणि चांदीने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. सगळीकडे याच धातूंची चर्चा आहे. पण तज्ज्ञ सांगतात की पुढील काळात खरी कमाई वेगळ्याच धातूमधून होऊ शकते. तो धातू म्हणजे तांबे (Copper). आता सोनं-चांदी नाही, तर तांब हा मार्केटचा ‘किंग’ आहे, असा दावा तज्ज्ञ करत आहेत.
आतापर्यंत तांब्याकडे एक साधा औद्योगिक धातू म्हणून पाहिलं जात होतं. पण आता चित्र बदलतंय. AI, इलेक्ट्रिक वाहनं, ग्रीन एनर्जी आणि विद्युतीकरणामुळे तांब्याची मागणी प्रचंड वाढत आहे. RKB Ventures चे संस्थापक राकेश बंसल यांचं म्हणणं आहे की पुढील अनेक वर्षं तांब्याच्या किमतींमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळू शकते. पुरवठा मर्यादित आणि मागणी झपाट्याने वाढत असल्यामुळे तांबे नवीन उच्चांक गाठू शकतं.
Reuters च्या अहवालानुसार, जागतिक तांबा बाजारात 2025 मध्ये सुमारे 1.24 लाख टनांची तूट राहण्याची शक्यता आहे, तर 2026 मध्ये ही तूट 1.5 लाख टनांपर्यंत जाऊ शकते. हेच सर्वात मोठे कारण आहे की तांब्याच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तांबे वीजवाहिन्या, ग्रिड्स, इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग आणि पायाभूत सुविधांसाठी आवश्यक आहे.
AI तंत्रज्ञान, डेटा सेंटर्स आणि इलेक्ट्रिक वाहनं वेगाने वाढत आहेत. भारतातही अनेक AI डेटा सेंटर्स उभे राहत आहेत. या सगळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर तांब्याची गरज असते. तज्ज्ञांच्या मते, तांब्याशिवाय ही डिजिटल आणि इलेक्ट्रिक क्रांती शक्यच नाही. बंसल यांच्या मते, भारतात सध्या तांब्याचा एकमेव मोठा उत्पादक म्हणजे Hindustan Copper.
राकेश बंसल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर लिहिलं आहे की, “तांबा हा नवा King आहे. पुरवठ्याची कमतरता, AI डेटा सेंटर्स, EVs आणि ग्रीन एनर्जी, या सगळ्यामुळे तांब्याच्या किमती वाढू शकतात. आता तांब्याचीच वेळ आहे करोडपती बनवण्याची.”
त्यांच्या मते, सोनं-चांदीप्रमाणेच तांब्यालाही सुरक्षित गुंतवणूक मानता येईल, कारण त्याची मागणी प्रत्यक्ष वापरावर आधारित आहे.
Macquarie या इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अंदाजानुसार, 2026 मध्ये जागतिक तांब्याची मागणी 27 दशलक्ष टनांपर्यंत वाढेल. 2024 च्या तुलनेत सुमारे 2.7 टक्के अधिक वाढ होईल. यामध्ये चीनमधील मागणीही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
रॉयटर्सच्या माहितीनुसार, AI डेटा सेंटर्समधील वाढती मागणी आणि मर्यादित पुरवठ्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांब्याचे दर 12,000 डॉलर प्रति मेट्रिक टनाच्या जवळ पोहोचत आहेत. यावर्षी आतापर्यंत तांब्याच्या किमती सुमारे 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
2025 मध्ये सोनं-चांदी चमकली, पण पुढील काळात तांबे खरी ‘स्टार कमोडिटी’ ठरू शकते. AI, EV, ग्रीन एनर्जी आणि पायाभूत सुविधांमुळे तांब्याची मागणी दीर्घकाळ टिकणारी आहे. पुरवठा मर्यादित असताना मागणी वाढत राहिली, तर तांब्याच्या किमती आणखी वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच तज्ज्ञ म्हणतात, सोनं-चांदीनंतर आता तांब्याची वेळ आली आहे.