

Middle East Airline Crisis Flight Disruptions: पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा फटका आता थेट विमान उद्योगाला बसू लागला आहे. 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने प्रत्युत्तर म्हणून केवळ इस्रायललाच नव्हे, तर पर्शियन गल्फमधील काही देशांनाही टार्गेट केले आहे. अमेरिकन लष्करी तळांसोबतच संयुक्त अरब अमिरातीतील दुबई आणि अबुधाबी या प्रमुख विमानतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याची माहिती आहे.
या हल्ल्यांमुळे हवाई क्षेत्र तात्पुरते बंद करण्यात आले आहे. नागरी विमान वाहतुकीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. इराणला यूएई आणि कतारसारख्या देशांच्या अर्थव्यवस्थेत विमान उद्योगाचे महत्त्व किती आहे हे माहिती आहे. यूएईमध्ये एमिरेट्स आणि एतिहाद या दोन जागतिक दर्जाच्या विमान कंपन्या आहेत, तर कतारमध्ये कतार एअरवेज ही प्रमुख आंतरराष्ट्रीय वाहतूक करणारी कंपनी आहे.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अनेक युरोपीय विमान कंपन्यांना रशियाच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणे शक्य नव्हते. त्यानंतर युरोप-आशिया दरम्यानचा एक पर्यायी मार्ग मध्य पूर्वेतून जात होता. आता तो मार्ग सुरक्षित नसल्यामुळे विमान कंपन्यांना आणखी लांब वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. यामुळे प्रवासाचा कालावधी वाढतोय आणि इंधन खर्चही वाढतोय.
2 मार्च रोजी युरोपातील मोठ्या विमान कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. ब्रिटिश एअरवेजची मालकी असलेल्या आयएजीच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. नंतर काही प्रमाणात त्यात सुधारणा झाली असली तरी बाजारात अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय प्रवासी हाताळणारे विमानतळ मानले जाते. 2025 मध्ये येथे 95 दशलक्ष प्रवाशांची वर्दळ होती. सध्या सुरु असलेल्या संघर्षामुळे हजारो प्रवासी गल्फ देशांत तसेच इतर भागांत अडकले आहेत. 2 मार्च रोजी या प्रदेशात येणाऱ्या सुमारे 3,800 उड्डाणांपैकी जवळपास 3 हजार उड्डाणे रद्द करण्यात आली, असे हवाई डेटा कंपनीच्या आकडेवारीतून समोर आले आहे. एमिरेट्स आणि एतिहाद यांनी उड्डाणे पुन्हा सुरू केली असली, तरी संपूर्ण सेवा पूर्ववत होण्यासाठी वेळ लागणार आहे.
संघर्षानंतर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. तेल महागले की विमान कंपन्यांचा इंधन खर्च वाढतो आणि शेवटी तिकिटांचे दरही वाढतात. त्यामुळे केवळ विमान कंपन्यांनाच नव्हे, तर प्रवाशांनाही याचा फटका बसणार आहे. याशिवाय, संघर्षाच्या वातावरणात प्रवासी वाहतूक कमी होते. विशेषतः मध्य पूर्वेतील पर्यटनावर त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
गल्फ देशांतील विमान कंपन्यांची क्षमता कमी झाल्याने काही प्रवासी पर्यायी मार्गांचा शोध घेत आहेत. चीनमधील मोठ्या विमान कंपन्या किंवा आफ्रिकेकडे जाणाऱ्या मार्गांसाठी इथिओपियन एअरलाईन्ससारख्या कंपन्यांना तात्पुरता फायदा होऊ शकतो. पश्चिम आशियातील तणाव किती काळ टिकणार, हे अद्याप स्पष्ट नाही. पण तोपर्यंत विमान उद्योग आणि प्रवासी दोघांनाही या संकटाचा सामना करावा लागणार आहे.