

Madhuri Dixit Juhu Flat Sale: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने आणि त्यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी मुंबईतील जुहू परिसरात असलेला आपला एक फ्लॅट विकला आहे. हा फ्लॅट त्यांनी 3 कोटी 90 लाख रुपयांना विकला असून, या व्यवहारातून त्यांना जवळपास दुप्पट प्रॉफिट झाला आहे.
माधुरी दीक्षित यांनी हा फ्लॅट 13 वर्षांपूर्वी 1 कोटी 95 लाख रुपयांना खरेदी केला होता. आता तो विकल्यानंतर त्यांना सुमारे 99 टक्के प्रॉफिट झाल्याचं समोर आलं आहे. हा फ्लॅट 780.13 चौरस फूट क्षेत्रफळाचा असून, जुहूतील डीप वर्षा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, आयरिस पार्क येथील चौथ्या मजल्यावर आहे.
रिअल इस्टेट डेटा अॅनालिटिक्स कंपनी CRE मॅट्रिक्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, या व्यवहाराचं रजिस्ट्रेशन 15 डिसेंबर रोजी करण्यात आलं. हा फ्लॅट एका महिलेने विकत घेतला असून, त्यांनी 19.5 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. महिलांना घर खरेदीत मिळणाऱ्या 1 टक्के सवलतीचा त्यांनी लाभ घेतला आहे.
जुहू हा परिसर मुंबईतील सर्वात महाग आणि प्रतिष्ठित मानला जातो. समुद्रकिनाऱ्यालगत असल्यामुळे येथे नवीन बांधकामासाठी जागा मर्यादित आहे. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी आहे.
रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते, जुहूमधील रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आणि कोस्टल रोडसारख्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पामुळे येथे गुंतवणूक वाढत आहे. याच कारणांमुळे मागील दहा वर्षांत जुहूमधील मालमत्तेचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत.
याआधी माधुरी दीक्षित यांनी मुंबईच्या आलिशान लोअर परेल भागात तब्बल 48 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला होता. हे अपार्टमेंट इंडियाबुल्स ब्लू प्रोजेक्टमध्ये असून, 53व्या मजल्यावर आहे. या फ्लॅटचं एकूण क्षेत्रफळ 5,384 चौरस फूट आहे.
मुंबईतील जुहू परिसर अनेक दशकांपासून बॉलिवूड कलाकारांचं आवडतं ठिकाण राहिलं आहे.
अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’, ‘प्रतीक्षा’ आणि ‘जनक’ हे प्रसिद्ध बंगले याच भागात आहेत. अजय देवगन आणि काजोल ‘शिवशक्ती’ नावाच्या भव्य बंगल्यात राहतात.
अक्षय कुमार, पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलांसह जुहूतील ‘प्राइम बीच’ बिल्डिंगमधील डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहतात. तर ऋतिक रोशन जुहू-वर्सोवा लिंक रोडवरील ‘एल पलाझो’ इमारतीत राहतो. माधुरी दीक्षित यांच्या फ्लॅट विक्रीचा हा व्यवहार मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमधील वाढीचं उदाहरण आहे.