

Elon Musk–Nikhil Kamath Podcast Promo: सोशल मीडियावर काल रात्री एक टीझर व्हायरल झाला आहे. मोनोक्रोम असलेल्या छोट्या व्हिडिओमध्ये झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत आणि अब्जाधीश इलॉन मस्क एकमेकांसमोर बसलेले दिसत होते. दोघांच्या हातात कॉफीचे कप होते, ते एकमेकांकडे पाहत होते, हलके स्मितहास्य आणि अखेरीस दोघांचं एकत्र हसणं… पाहणाऱ्यांना क्षणभर वाटलं की "WTF Is" या लोकप्रिय पॉडकास्टचा हा नवा एपिसोड असावा.
कामत यांनी पोस्टसोबत फक्त दोन शब्द लिहिले: “Caption this.” यामुळे सोशल मीडिया जोरदार चर्चा सुरु झाली. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे, तर काहींनी व्हिडिओ खरा आहे की AI-जनरेटेड, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका X युजरने थेट मस्कच्या मालकीच्या प्लॅटफॉर्मवरील इन-हाऊस AI चॅटबॉट, ग्रॉकलाच विचारलं की, “Is this video real or AI?”
ग्रॉकने क्षणही न घालवता सरळ उत्तर दिलं: “हो, हा व्हिडिओ AI-Generated दिसत आहे. दोन चेहऱ्यांमधील अनैसर्गिक फेस-मॉर्फिंग स्पष्टपणे दिसत आहे, जे डीपफेक किंवा AI एडिट्सचा भाग आहे.” त्या युजरने मात्र ग्रॉकच्या उत्तराला विरोध केला. त्याचं म्हणणं होतं की टीझर खरा आहे, फक्त त्याला मुद्दाम AI लूक दिला आहे. पण ग्रॉकने पुन्हा सांगितलं:
“या व्हिडिओमधील स्मूथ फेस-मॉर्फिंग हे AI चे क्लासिक फिचर आहे. ऑनलाइन चर्चाही त्याच दिशेने सुरु आहे. सध्यातरी या दोघांचा खरा पॉडकास्ट एपिसोड असल्याचा कोणताही पुरावा नाही.”
युजरने शेवटी विचारलं: “Are you 100% sure?” आणि इथेच चर्चा संपली, ग्रॉकने पुढे काहीही उत्तर दिले नाही.
निखिल कामतचा “WTF Is” हा पॉडकास्ट मागील काही वर्षांत खूप लोकप्रिय झाला आहे. या शोमध्ये बिल गेट्स, किरण मजूमदार-शॉ, रणबीर कपूर, नंदन निलेकणी, कुमार मंगलम बिर्ला यांसारख्या दिग्गज व्यक्तींनी सहभाग घेतला आहे. कामत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही मुलाखत घेतली होती.