India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार करारातील 7 महत्त्वाचे मुद्दे कोणते? ट्रम्प–मोदी चर्चेत नेमकं काय ठरलं?

India-US Trade Agreement: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत व्यापार करार झाल्याचा दावा केला आहे. या करारानुसार अमेरिकेने भारतावरील शुल्क 25 टक्क्यांवरून 18 टक्के करण्याचे जाहिर केले आहे.
India US trade deal Trump Modi
India US trade deal Trump ModiPudhari
Published on
Updated on

India US trade deal Trump Modi: अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारसंबंधांबाबत मोठी घोषणा करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत व्यापार करार झाल्याचा दावा केला आहे. ऑगस्ट 2025 मध्ये भारतावर 50 टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावल्यानंतर आता हा करार जाहीर करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल' वरून या कराराची माहिती दिली.

या करारानुसार भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवरील शुल्कात मोठी कपात करण्यात आल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकेने भारतावर लावलेले 25 टक्के ‘रिसिप्रोकल टॅरिफ’ आता कमी करून 18 टक्क्यांवर आणले जातील. त्याचवेळी भारताने अमेरिकेतील वस्तूंवरील टॅरिफ आणि टॅरिफमधील अडथळे शून्यावर आणण्यास सहमती दर्शविल्याचेही ट्रम्प म्हणाले.

भारत-अमेरिका व्यापार करारातील महत्त्वाचे मुद्दे

ट्रम्प यांच्या 'ट्रुथ सोशल'वरील पोस्टमध्ये व्यापार करारासंदर्भात अनेक मुद्दे होते. भारताने अद्याप या व्यापार कराराला दुजोरा दिलेला नाही. ट्रम्प यांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

  1. भारत अमेरिकन निर्यातीवरील आयात शुल्क कमी करून शून्य करेल.

  2. अमेरिका ‘रिसिप्रोकल टॅरिफ’ शुल्क 25% वरून 18 % पर्यंत कमी करेल.

  3. ट्रम्प यांनी दावा केला की, भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल.

  4. भारत अमेरिकेकडून तेलाची खरेदी वाढवेल.

  5. भारत संभाव्यतः व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्यास सुरुवात करू शकतो.

  6. ट्रम्प म्हणाले की, भारताने ऊर्जा, कृषी, कोळसा आणि तंत्रज्ञान यासह अनेक अमेरिकन वस्तूंवर 500 अब्ज डॉलर्स खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे.

  7. ट्रम्प यांनी दावा केला की, या करारामुळे रशिया-युक्रेन युद्ध थांबण्यास मदत होईल.

या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, “माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी आज संवाद साधून आनंद झाला. ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांवरील शुल्क 18 टक्क्यांवर आणण्याच्या निर्णयाबद्दल भारतातील 1.4 अब्ज नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार.” भारत आणि अमेरिका या जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि लोकशाही देशांनी एकत्र काम केल्यास दोन्ही देशांना त्याचा मोठा फायदा होईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये या कराराचे अनेक मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार भारत अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवरील शुल्क पूर्णपणे कमी करेल. तसेच भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवेल, असा दावाही त्यांनी केला आहे. ट्रम्प प्रशासनाने यापूर्वी असा आरोप केला होता की, भारत रशियाकडून तेल खरेदी करुन रशिया-युक्रेन युद्धाला अप्रत्यक्ष मदत करत आहे.

India US trade deal Trump Modi
Donald Trump | चर्चेला या, अन्यथा आणखी तीव्र हल्ले

ट्रम्प यांनी असेही सांगितले की, भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करेल आणि भविष्यात व्हेनेझुएलाकडूनही तेल घेण्याचा विचार करू शकतो. याशिवाय भारत ऊर्जा, शेती, कोळसा, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांतून सुमारे 500 अब्ज डॉलर्सची अमेरिकन उत्पादने खरेदी करण्यास तयार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या करारामुळे रशिया-युक्रेन युद्ध थांबण्यास मदत होईल, असा दावाही ट्रम्प यांनी केला. भारताने रशियन तेल खरेदी थांबविल्यास रशियावर आर्थिक दबाव वाढेल आणि त्यामुळे युद्ध संपण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

India US trade deal Trump Modi
Israel Control Donald Trump: ट्रम्प इस्त्रायलच्या 'कंट्रोल'मध्ये... एपस्टीन फाईलशी आहे कनेक्शन?

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करताना त्यांना “माझ्या सर्वात चांगल्या मित्रांपैकी एक आणि भारताचे प्रभावी नेते” असे संबोधले आहे. “मोदी आणि मी असे नेते आहोत, जे काम करून दाखवतो,” असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या सर्व मुद्द्यांवर भारत सरकारकडून अद्याप अधिकृत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिक्रियेमुळे भारत-अमेरिका व्यापारसंबंधांमध्ये मोठा बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा करार प्रत्यक्षात कसा अंमलात येतो आणि त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news