

Retail Inflation
अन्नधान्याच्या किमतींतीत आणखी घट झाल्यामुळे देशातील किरकोळ महागाईचा दर एप्रिलमध्ये सहा वर्षांच्या निचांकी पातळीवर आला. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. एप्रिलमधील महागाई दर ३.१६ टक्के आहे. तो मार्चमध्ये ३.३४ टक्के होता. विशेष म्हणजे सलग तिसऱ्या महिन्यात महागाई दर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ४ टक्के मध्यम मुदतीच्या लक्ष्यापेक्षा कमी राहिला.
ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित महागाई दर मार्च आणि एप्रिल २०२४ मध्ये अनुक्रमे ३.३४ टक्के ४.८३ टक्के होता. जुलै २०१९ मध्ये तो ३.१५ टक्के होता.
एप्रिलमध्ये भाजापाल्यांच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी कमी झाल्या. मार्चमध्ये या किमती ७.०४ टक्क्यांनी घसरल्या होत्या. एप्रिलमध्ये तीव्र उष्णतेची लाट राहुनही भरघोस पीक उत्पादनामुळे अन्नधान्याच्या किमती कमी राहिल्याचे दिसून आले.
फेब्रुवारीमध्येही किरकोळ महागाई दर ३.६१ टक्क्यांपर्यंत घसरला होता. फेब्रुवारीमध्ये प्रामुख्याने भाज्या, अंडी, मांस-मासे, डाळी आणि दूध यांच्या दरांमध्ये घसरण झाल्याने किरकोळ महागाईच्या दरामध्ये ही घट झाली असल्याचे सांख्यिकी मंत्रालयाने म्हटले होते.
ग्रामीण भागातील महागाईचा दर मार्चमधील ३.२५ टक्क्यांवरून एप्रिलमध्ये २.९२ टक्क्यांपर्यंत खाली आला. तर शहरी भागातील महागाई दर ३.४३ टक्क्यांवरून ३.३६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. भाजीपाला डाळी, फळे, मांस आणि मासे, तृणधान्ये आणि पर्सनल केअर वस्तू यासारख्या प्रमुख श्रेणींमधील किमतीत घट झाली आहे. यामुळे अन्नधान्याची महागाई कमी झाली आहे. RBI Governor Sanjay Malhotra
महागाई कमी झाल्याने मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आरबीआयकडून व्याजदरात कपात करण्याची आशा निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात पतधोरणविषयक जाहीर करताना आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले होते की, अन्नधान्याच्या किमतींवरील अनुकूल दृष्टिकोनामुळे महागाईत घट होत चालली आहे.