

Stock Market Crash
सोमवारच्या बंपर तेजीनंतर मंगळवारी गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग करण्यावर भर दिला. परिणामी, शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स १,२८१ अंकांनी घसरून ८१,१४८ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ३४६ अंकांच्या घसरणीसह २४,५७८ वर स्थिरावला. जागतिक स्तरावरील अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या दरातील वाढ हे घटकही बाजारातील घसरणीमागे कारणीभूत ठरले.
भारत- पाकिस्तान शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराने सोमवारी चार वर्षांतील एका दिवसातील सर्वात मोठी तेजी नोंदवली होती. सेन्सेक्स तब्बल २,९७५ अंकांनी वाढला होता. तर निफ्टी ५० निर्देशांकाने ९१६ अंकांची वाढ नोंदवली होती. सेन्सेक्स आणि निफ्टीची ही वाढ अनुक्रमे ३.७ टक्के आणि ३.८ टक्के एवढी होती. पण मंगळवारी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी १ टक्केहून अधिक घसरले.
फायनान्सियल, बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील हेवीवेट शेअर्समध्ये आज घसरण झाली. एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस आणि रिलायन्स आदी शेअर्सचा त्यात समावेश होता. सेन्सेक्सवर मंगळवारी इन्फोसिसचा शेअर्स ३ टक्केहून अधिक घसरला. टीसीएस २.७ टक्के, एचडीएफसी आणि कोटक बँक प्रत्येकी १ टक्केहून अधिक घसरले.
सोमवारी सेन्सेक्सवर इन्फोसिसचा शेअर्स ७.९ टक्के आणि टीसीएस शेअर्स ५ टक्के वाढला होता. त्यात आज या आयटी शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग दिसून आले. यामुळे ते घसरले असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली असून सोमवारी ते दोन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ६४.७४ डॉलरवर गेले आहे. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) ६१.७७ डॉलरवर पोहोचला आहे. गेल्या पंधरा दिवसांत दोन्हीमध्ये ५.५ टक्केपेक्षा वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, दुसरीकडे आज 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण कंपन्यांच्या शेअर्सनी रॉकेट भरारी घेतली. आज निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक ४ टक्के वाढला. भारतात संरक्षण क्षेत्रातील निर्यात वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत. सर्वाधिक वाढ झालेल्या शेअर्समध्ये जीआरएसई, Zentec, कोचिन शिपयार्ड, भारत इलेक्ट्रॉनिक यांचा समावेश होता. हे शेअर्स ३ ते ५ टक्के वाढले.