

High Electricity Bill Causes:
नवी दिल्ली: अनेकदा घरात कमीत कमी वीज वापरूनही प्रत्येक महिन्याला अव्वाच्या सव्वा वीज बिल आल्याची तक्रार ग्राहक करत असतात. पण ही तफावत केवळ विजेच्या वापरामुळे नसून एका छोट्या चुकीमुळे होऊ शकते. आपल्या वीज कनेक्शनच्या 'मंजूर लोड'कडे दुर्लक्ष करणे हेच वाढीव बिलामागील मुख्य कारण ठरू शकते.
जास्त वीज बिल येण्यामागे अनेकदा तुमच्या जोडणीवरील 'लोड' हे कारण असते. जेव्हा तुम्ही मंजूर केलेल्या लोडपेक्षा जास्त वीज वापरता, तेव्हा बिल वाढते. नवीन वीज कनेक्शन घेताना घरातील उपकरणांच्या आवश्यकतेनुसार एक ठराविक लोड (उदा. १ KW किंवा २ KW) मंजूर केला जातो; परंतु जसजशी घरातील विद्युत उपकरणांची संख्या वाढते, तसतसा विजेचा वापर आणि परिणामी प्रत्यक्ष लोड वाढतो. तरीही, अनेकदा लोक त्यांचा मंजूर लोड वाढवून घेत नाहीत. परिणामी, मंजूर लोड आणि प्रत्यक्ष वापर यांमधील तफावत लक्षात आल्यावर वीज विभाग जास्त दराने शुल्क आकारतो. त्यामुळे केवळ विजेचा वापर किती होतो हे महत्त्वाचे नाही, तर जोडणीचा लोडही तितकाच महत्त्वाचा आहे. गरजेनुसार हा लोड कालांतराने वाढवता येतो.
जर तुमचा मंजूर लोड कमी असेल आणि तुम्ही घरातील उपकरणे एकाच वेळी सुरू केल्यास यंत्रणेवर अतिरिक्त भार पडतो. परिणामी, प्रत्येक बिलामध्ये अतिरिक्त 'फिक्स्ड चार्जेस' किंवा 'डिमांड चार्जेस' जोडले जातात; लोड जितका जास्त, तितके फिक्स्ड चार्जेस जास्त. आता बहुतेक भागांत 'स्मार्ट मीटर्स' बसवलेले असल्याने, एकाच वेळी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुरू असल्याने आणि निश्चित मर्यादेपेक्षा जास्त वीज वापरल्याने स्मार्ट मीटर कमाल लोडची नोंद करते, ज्यामुळे लागू असलेली लोड पातळी आपोआप वाढते. यामुळे तुमचे फिक्स्ड चार्जेसही वाढतात.
तसेच, तुमचा विजेचा वापर मंजूर लोडपेक्षा जास्त झाल्यामुळे बिलावर दंड आकारला जातो आणि 'सिक्युरिटी चार्ज' (सुरक्षा ठेव शुल्क) जोडला जातो. शिवाय, जास्त वीज लोडमुळे प्रति युनिट दरही वाढतो, ज्यामुळे तुमचे वीज बिल आपोआप वाढते.
तुमचे वीज बिल बजेटमध्ये ठेवण्यासाठी, एकाच वेळी खूप जास्त इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुरू ठेऊ नका. याव्यतिरिक्त, तुमच्या घराच्या विजेच्या 'लोड'ची (विद्युत भार क्षमतेची) तपासणी करून घ्या; जेणेकरून तुम्हाला काही दंड आकारला जात आहे का, किंवा प्रत्यक्ष वीज-वापर कमी असूनही केवळ जास्त 'लोड'मुळे तुम्हाला अधिक बिल भरावे लागत आहे का, हे समजेल. या साध्या उपाययोजना केल्यास तुमचे वीज बिल वाढण्यापासून रोखण्यास मदत होऊ शकते.