

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज, 31 ऑगस्ट रोजी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून तेजीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मौल्यवान धातूंच्या किमतींवर आता दबाव वाढला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याचा भाव 1,887 रुपयांनी घसरून 1,54,394 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 3,856 रुपयांची घसरण झाली असून, ती 2,32,848 रुपये प्रति किलो या पातळीवर व्यवहार करत आहे.
सोन्याच्या किमतीवर शुक्रवारीच दबाव निर्माण झाला होता. 28 ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात सुमारे 3.2 टक्क्यांची घसरण झाली. अमेरिकेतील बॉन्ड यिल्डमध्ये झालेली वाढ हे त्यामागील प्रमुख कारण मानले जात आहे.
फेडरल रिझर्व्हशी संबंधित वक्तव्यांनंतर गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा एकदा अमेरिकेतील महागाईच्या परिस्थितीकडे वळले आहे. महागाई नियंत्रणात आली नाही, तर व्याजदर कपातीच्या शक्यतेवर परिणाम होऊ शकतो, अशी बाजारातील गुंतवणूकदारांची चिंता आहे.
सध्या मौल्यवान धातूंवर दोन बाजूंनी दबाव निर्माण झाला आहे. एका बाजूला कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेतील बॉन्ड यिल्ड उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून सप्टेंबरमध्ये व्याजदर वाढण्याची शक्यता वाढली आहे.
Reutersच्या अहवालानुसार, बाजारात सप्टेंबरमध्ये अमेरिकन फेडकडून व्याजदर वाढण्याची शक्यता सुमारे 57 टक्के मानली जात आहे. त्यामुळे सोन्यासह इतर मौल्यवान धातूंवर दबाव कायम आहे.
अमेरिकेच्या Treasury Bond Yields मध्ये वाढ झाली की सोन्यासारख्या मालमत्तेचे आकर्षण काही प्रमाणात कमी होते. याचे कारण म्हणजे सरकारी बॉन्डमध्ये गुंतवणूक केल्यास नियमित व्याज मिळते, तर सोन्या-चांदीतून कोणतेही नियमित व्याज उत्पन्न मिळत नाही.
त्यामुळे जास्त परताव्याच्या शोधात गुंतवणूकदार मौल्यवान धातूंमधून पैसा काढून बॉन्डसारख्या पर्यायांकडे वळवू शकतात. परिणामी सोन्या-चांदीच्या किमतींवर आणखी दबाव येण्याची शक्यता असते.
31 ऑगस्ट रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे.
दिल्ली: 15,838 रुपये प्रति ग्रॅम
मुंबई: 15,823 रुपये प्रति ग्रॅम
पुणे: 15,823 रुपये प्रति ग्रॅम
नागपूर: 15,823 रुपये प्रति ग्रॅम
दरम्यान, चांदीचा भाव सुमारे 254 रुपये प्रति ग्रॅम, तर 10 ग्रॅम चांदीचा दर सुमारे 2,941 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सध्या सोन्या-चांदीच्या बाजारात अमेरिकेतील व्याजदर, महागाई, बॉन्ड यिल्ड, कच्च्या तेलाच्या किमती आणि डॉलरची हालचाल हे प्रमुख घटक ठरत आहेत. त्यामुळे दरांमध्ये आगामी काळातही मोठे चढ-उतार होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बाजारातील परिस्थितीचा आणि जोखमीचा विचार करणे महत्त्वाचे आहे.